`अलीबाबा आणि चाळीशीतले चोर` यांचा नेमका गुन्हा काय? उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित
`अलीबाबा आणि `चाळीशी`तले चोर` हा मल्टिस्टारर चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित `अलीबाबा आणि `चाळीशी`तले चोर` या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केलं आहे.
मुंबई : नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' हा मल्टिस्टारर चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. पोस्टरधील कलाकारांच्या चेहऱ्यावरील चित्रविचित्र, प्रश्नार्थक हावभाव पाहून काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येतोय. त्यातच लिपस्टिकचे निशाण ही उत्सुकता अधिक वाढवतेय. आता यामागचे गुपित मात्र चित्रपट आल्यावरच उलगडणार आहे. यात मु्क्ता बर्वे, सुबोध भावे, श्रृती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून या सगळ्या मातब्बर कलाकारांना एकत्र पडद्यावर पाहाणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
आदित्य इंगळे दिग्दर्शित 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले आहे, तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ''या चाळीशीतील चोरांनी केलेला गुन्हा जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली असेल. मात्र या गुन्ह्याची उकल चित्रपट आल्यावरच होणार आहे. हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. यात विनोद, धमाल, गोंधळ आणि मजा आहे. विवाहीत असण्याचा गुन्हा या चाळीशीतील चोरांनी केला आहे. आता या गुन्ह्याची त्यांना काय शिक्षा मिळणार, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट विनोदी आहे. सगळेच कलाकार मातब्बर असल्याने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.''
'अलीबाबा आणि चाळीस चोर' ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' ऐकून जरा नवलच वाटले ना? तर 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती २९ मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले चोर दाखल होणार आहेत. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर कलाकार एकत्र येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज असणार आहे.