लॉस एंजेलिस : जगभरातील सिनेप्रेमींना उत्सुकता असणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या ऑस्कर सिझनसाठी संपूर्ण हॉलिवूड रेड कार्पेटवर झळकण्यासाठी तयार झालं असून, आता ऑस्करची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता लॉस ऐंजेलिसमधील डॉल्बी थिएटरध्ये ऑस्करचा हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलिवूडमध्येच नाही तर भारतातही ऑक्सरच्या सोहळ्यासाठीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण कसं, कुठे, केव्हा पाहता येणार याबाबत अनेकांमध्ये शंका आहे. विविध वाहिन्या, वेबसाईट आणि सोशल मीडियाची उपलब्धता असताना ऑस्कर सोहळा नेमका कसा आणि कुठे पाहयचा यासाठी लोक इंटरनेटचा आधार घेताना दिसत आहेत. 


भारतीय प्रमाण वेळेनुसार सोमवारी २५ फेब्रुवारीला सकाळी ६.३० वाजल्यापासून ऑस्करचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. भारतात ऑस्करचं संपूर्ण थेट लाइव्ह प्रक्षेपण 'हॉट स्टार'वर पाहता येणार आहे. यंदाचा ऑस्कर रेड कार्पेट सोहळा ट्विटरच्या माध्यमातून २५ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजल्यापासून पाहता येणार आहे. ट्विटर @TheAcademy या हँडलवरून या लिंकवर क्लिक केल्यास https://twitter.com/theacademy ऑस्कर पुरस्कार पाहता येणार आहे. 


ऑस्कर पुरस्काराचं यंदाचं हे ९१वं वर्ष आहे. यंदाचा ऑस्कर खास ठरणार आहे. यावर्षीचा ऑस्कर कोणत्याही प्रकारच्या  सुत्रसंचालकाविना पार पडणार आहे. सूत्रसंचालक नसल्यामुळे पुरस्कार देणाऱ्या कलाकारांवर लक्ष केंद्रित केलं जाणार असून ऑस्कर पुरस्कार प्रदान करणारे कलाकारच हा पुरस्कार सोहळा पुढे घेऊन जातील. त्यामुळे यंदाच्या या सूत्रसंचालकाविना होणाऱ्या ऑस्करला प्रेक्षकांची किती पसंती  मिळते ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.