कोण असेल गॅरीची नवी शनाया?
झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही लोकप्रिय मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे.
मुंबई : झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही लोकप्रिय मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. गुरु-शनायाने मिळून राधिकाला दिलेल्या त्रासाचा बदला राधिका चांगलाच घेत आहे. नवी बॉस बनून राधिका गुरु-शनायाला चांगलीचा कामाला लावते. त्यामुळे त्रासलेल्या, पिचलेल्या गुरु-शनायाचे धाबे दणाणले आहेत. मालिकेतील हे रंजक वळण प्रेक्षकांना भावलं आहे.
शनाया अत्यंत लोकप्रिय
गेली दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. यातील शनायाची व्यक्तिरेखा चांगलीच लोकप्रिय झाली. शनायाचे नखरे, नटखट अदा, स्टाईल, तिचा मुर्खपणा, तिची मस्ती लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भावली. अनेक प्रेक्षक तर फक्त शनायासाठी मालिका बघतात. शनायाची भूमिका नेगेटीव्ह असली तरी त्यात हलके-फुलकेपणा आणण्याचे काम या टीमला भारीच जमले आहे.
रसिकाला पर्याय नाही
अभिनेत्री रसिका सुनीलचे हे पहिलेच काम असले तरी तिने ते अगदी जबाबदारीने पार पाडले आहे. तिचा अभिनय इतका सहज सुरेख आहे की, तिच्याऐवजी या भूमिकेसाठी दुसरं कोणाचा विचारच आपल्याला करता येत नाही. शनायाची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, रसिका सुनीलसाठीच शनाया हे पात्र बनले आहे, असे वाटते.
रसिकाच्या उत्तम अभिनयामुळे अल्पावधीत हे पात्र लोकप्रिय झाले आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान निर्माण केले. तिच्या वागणूकीचा अनेकांना राग येत असला तरी मिळणारे प्रेमही तितकेच खरे आहे.
शनायाचा अखेर रामराम
पण आता रसिका सुनील म्हणजेच शनाया ही मालिका सोडत असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण त्या अफवा असल्याचे समोर आले होते. पण आता पुन्हा एकदा शनाया ही मालिका सोडत असल्याचे समजतेय. शनाया म्हणजे रसिका दिग्दर्शन आणि फिल्ममेकिंगचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार असल्याचं समजलं आहे. त्यामुळेच ती या मालिकेतून एक्झिट घेत आहे.
कोण असणार नवी शनाया?
मालिकेत रंजक ट्विस्ट सुरु असताना मोक्याच्या क्षणी रसिका ही मालिका सोडत असल्याने निर्मात्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शनायाच्या भूमिकेसाठी आतापर्यंत १०-१२ जणींची ऑडिशन्स झाली असून त्यातून नक्की निवड कोणाची झाली, हे अद्याप समजलेले नाही.
नवी शनाया कोण असणार?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याचबरोबर नवी येणारी शनाया प्रेक्षकांना किती भावेल, हा ही एक प्रश्नच आहे.