मुंबई  : रोशन कुटुंबाचं बॉलिवूडमध्ये नाव मोठं आहे. राकेश रोशन यांनी अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात देखील आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी 'कोई मिल गया', 'करन-अर्जून', 'क्रिश' चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय त्यांनी 'सीमा', 'मन मंदीर', 'आंखो आंखो मैं', 'बुनियाद', 'झूठा कहीं का', 'खूबसूरत', 'खट्टा मीठा' या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्याच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडवर  वर्चस्व गाजवणारे राकेश रोशन अंडरवर्ल्डच्या दहशतीखाली जगत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त राकेश रोशनचं नाही तर बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना देखील अंडरवर्ल्डचा धोका होता. जेव्हा राकेश रोशन यांनी मुलगा ऋतिक रोशनला 'कहो ना प्यार है' चित्रपटाच्या माध्यामातून लाँच केलं. तेव्हा चित्रपट  सुपरहिट ठरला आणि चित्रपटाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. 10 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 63  कोटी रूपयांचा गल्ला जमवला. 


चित्रपटाला  मिळालेल्या  यशानंतर राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना 2 गोळ्या लागल्या. तेव्हा त्यांचा ड्रायव्हर आनन फानन यांनी राकेश रोशन यांचा जीव वाचवला. अंडरवर्ल्डने त्यांना जीवे मारण्यासाठी नाही तर चित्रपटाला मिळालेल्या यशाचा भाग मागण्यासाठी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. 


पण रोकेश रोशन यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आबू सालेम नाराज झाला. राकेश रोशन यांच्यावर दोन जणांनी हल्ला केला. त्यामधील एक शार्प शूटर होता. या गोष्टीचा खुलासा जेव्हा खुद्द आबू सालेम यांनी केला तेव्हा त्या शूटरला अटक करण्यात आली. फक्त राकेश रोशनचं नाही तर अभिनेता शाहरूख खान पासून ते गुलशन कुमार यांच्यापर्यंत सर्वांना अंडरवर्ल्डकडून धमकीचे फोन यायचे. 


अंडरवर्ल्ड बॉलिवूडकरांकडून पैशांची मागणी करायचे. यामध्ये आबू सालेम आणि छोटा शकिल यांचा सहभाग असायचा. गुलशन कुमार यांच्या  हत्येनंतर अंडरवर्ल्डबद्दल बॉलिवूडकरांच्या मनात आणखी भीती निर्माण झाली. पण आता बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डची  दहशत राहिली नाही.