मुंबई : 'जय देवा जय शिव मार्तंडा...' असा जयघोष झाला, की तिन्ही सांजेच्या वेळी मल्हारी मार्तंडाच्याच रुपात एक चेहरा घराघरात यायचा. हा चेहरा होता अभिनेता देवदत्त नागे याचा. खंडोबाची व्यक्तीरेखा त्यानं अशी काही साकारली की, खंडेराय असेच दिसत असतील यावर प्रेक्षकांचा विश्वास बसला. (why jai malhar fame actor devdatta nage doesnt visit jejuri on somvati amavasya )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवती अमावस्येच्या दिवशी जेव्हा एकिकडे जवळपास दोन वर्षांनंतर जेजुरीगड आणि कडेपठारावर भक्तांची गर्दी उसळलेली आहे, तेव्हा मात्र कायम या देवस्थानाला भेट देणारा देवदत्त कुठंय हाच प्रश्न अनेकांना पडला. 


मुळात या दिवशी छोट्या पडद्यावरच्या या देवानं जेजुरीला भेट दिलेली नाही. यामागे तितकंच महत्त्वाचं कारणंही आहे. 'आपण कायमच चंपाषष्ठीच्या दिवशी, जेव्हा मल्हारी मार्तंडाचा प्रकट दिन असतो, तेव्हा जेजुरी गडावर जातो. देवाची कृपाच म्हणा, हा दिवस कधीच चुकत नाही. पण, सोमवतीच्या दिवशी गडावर उसळणारी गर्दी पाहता, तिथं आपल्यामुळं येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, याच भावनेनं विश्वस्तांचा आग्रह असूनही मी जेजुरीला नाही जात', असं देवदत्त झी 24 तासशी संवाद साधताना म्हणाला. 


आपण तिथं गेलं असता देवस्थान परिसरात गोंधळ उडतो, आपल्या सोयीसाठी विश्वस्तांची धावपळ होते. पण, गर्दीच्या वेळी भाविकांना याचा त्रास नको, या कारणामुळं आज दुरूनच त्यानं जेजुरीपुढे हात जोडले. 



सोमवतीला अजूनपर्यंत जेजुरी न गाठणारा देवदत्त 'आपण, कधीतरी गडावर लपूनछपून सोमवतीच्याच दिवशी नक्की जाऊ', अशी आशा बाळगून आहे. 



माझ्यामुळं इतरांना त्रास नको, या भावनेनं सोमवतीच्या दिवशी जेजुरी न गाठणारा देवदत्त त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत देव शोधतो. म्हणूनच की काय, नकळतच त्याच्या जीवनात अनेकदा गडावर जाऊन देवाची भेट घेण्याचा सुरेख योग येतो.