...म्हणून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली का? धक्कादायक खुलासा
अनेक हिट चित्रपट देऊनही बॉलिवूडमधील काही बड्या निर्मात्यांनी आणि मोठ्या प्रस्थांनी त्याच्यावर बहिष्कार टाकल्याची कुजबूज सुरु होती.
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या वृत्ताने कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. अद्याप त्याच्या आत्महत्येचे खरे कारण स्पष्ट झाले नसले तरी नैराश्याच्या भरात त्याने आत्महत्या केल्याा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या चित्रपट अभ्यासक, समीक्षक अमोल उद्गीरकर यांची एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अमोल उद्गीरकर यांनी व्यावसायिक अपयश हे सुशांतच्या आत्महत्येचे कारण ठरल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सुशांत सिंह राजपूत हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील आऊटसाईडर होता. त्यामुळे अनेक हिट चित्रपट देऊनही बॉलिवूडमधील काही बड्या निर्मात्यांनी आणि मोठ्या प्रस्थांनी त्याच्यावर बहिष्कार टाकल्याची कुजबूज सुरु होती. त्याला काम मिळू नये, यासाठी काही लोक प्रयत्नशील होते, असे उद्गीरकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
Zee TV च्या 'या' मालिकेमुळे सुशांत सिंह झाला होता लोकप्रिय
प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री सुशांतचे काही मित्र त्याच्या घरी होते. आज सकाळी बराचवेळ सुशांतने घरचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सध्या पोलीस यासंबंधी तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळे आता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडमध्ये अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.