शबाना आझमी, जावेद अख्तर यांना का नाही स्वत:चं मूल?
फरहान आणि झोया कोणाची मुलं?
मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी या जोडीचा प्रेमापासून लग्नापर्यंतचा प्रवास काहीसा नव्हे, बराच फिल्मी आहे. अनेक अडथळे ओलांडून ही जोडी अखेर आनंदाच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आणि सर्वांना निखळ प्रेमाचा आदर्श पायंडा घालून दिला.
नातं परिपूर्ण असूनही या जोडीच्या नात्यामध्ये एका गोष्टीची कमतरता मात्र कायम राहिली. ही गोष्ट म्हणजे शबाना आणि जावेद अख्तर यांचं स्वत:चं मूल.
जावेद अख्तर यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. फरहान आणि झोया, अशी त्यांची नावं.
पहिल्या लग्नातून वेगळं झाल्यानंतर अख्तर यांनी शबाना यांच्याशी लग्नगाठ बांधली. पण, लग्नानंतर अनेक वर्षे या जोडीला स्वत:चं मूल नव्हतं.
एका मुलाखतीत शबाना यांनी यामागचं कारण स्पष्ट केलं होतं. काही वैद्यकिय कारणांनी शबाना आई होऊ शकल्या नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं.
आई होऊ न शकण्याच्या या वास्तवानं त्यांचं काळीज पिळवटलं होतं. पण, अखेर त्यांनी याचा स्वीकार केला होता.
जीवनात सर्वांनाच सर्वच गोष्टी मिळतात असं नाही, याच ओळीनं स्वत:ची समजूत घालत त्यांनी जगणं सुरु ठेवलं. ज्यामध्ये त्यांना जोडीदाराच्या रुपात जावेद अख्तर यांनी पूर्ण साथ दिली.
जावेद आणि शबाना यांच्यामधील नातं अधिक बळकट होत होतं. यामध्ये झोया आणि फरहान या दोघांनीही या जोडीला चांगली साथ दिली होती.
स्वत:चं मूल नसल्याचं दु:ख शबाना यांच्या मनात होतं, पण यापलीकडेही नाती आणि नात्यांचे बंध आहेत हेच त्यांनी आतापर्यंतच्या प्रवासात अनुभवलं.