मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर त्याप्रकरणीच्या तपासाला वेग आला. पाहता पाहता दर दिवशी यासंबंधीची माहिती समोर आली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यातच आता सुशांतच्या नातेवाईकांकडून धक्कादायक दावा करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आमदार आणि सुशांतचे नातेवाईक असणाऱ्या निरज सिंह बब्लू यांनी सदर आत्महत्या प्रकरणीच्या साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा मंगळवारी केला. मुंबई पोलिसांकडून साक्षीदारांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय साक्षीदारांची हत्या होण्याची भीती व्यक्त करत बब्लू यांनी त्यांना तातडीनं संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 


१३ ऑगस्टला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणीचा तपास आपल्याकडे देण्याची मागणी केली. शिवाय या प्रकरणामध्ये आर्थिक गोष्टींचा तपास करण्यासाठी ईडीचा तपास सुरु ठेवण्याची विनंतीसुद्धा सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. 


 


दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता यापुढं नेमकं कोणतं वळण मिळणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी सुशांत सिंह राजपूत यानं आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली होती. नैराश्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. पण, त्यानंतर मात्र अनेक अनुत्तरित प्रश्नांनी डोकं वर काढलं आणि यामध्ये अनेक धागेदोरे, व्यक्ती जोडल्या गेल्या.