मुंबई : 'गेम ऑफ थ्रोन्स' या बहुचर्चित सीरिजचीच चर्चा सध्या प्रेक्षक आणि कलावर्तुळात सुरु आहे. या सीरिजच्या विविध पर्वांपासून ते त्यातील प्रत्येक पात्राविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात 'गेम ऑफ थ्रोन्स' पोहोचलं असून, भारतातही त्याची लोकप्रियता काही कमी नाही. मुळात या सीरिजचं भारताशीही नातं जोडलं गेलं आहे. हे नातं तसं खास आहे. कारण, सीरिजमध्ये Dothraki warrior ‘Qhono’ साकारणारा अभिनेता याचं भारताशी खास नातं आहे. केरळशी त्याची नाळ जोडली गेली आहे, तो भारतीय- रशियन वंशाचा आहे. त्यामुळे हा मल्याळी 'मच्चा' गेम ऑफ थ्रोन्सच्या निमित्ताने सध्या भारताचंही नाव जगभरात पोहोचवत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टॅझ नायर असं या 'ओहनो' साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे. नायर साकारत असणाऱ्या पात्राने सहाव्या पर्वाच्या पहिल्याच भागामध्ये या सीरिजमध्ये प्रवेश केला होता. आठव्या आणि शेवटच्या पर्वाच्या तिसऱ्या पर्वात तो ठार झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्याने साकारलेलं पात्र हे सीरिजच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं कारण होतं हे सीरिज पाहणाऱ्यांच्या लक्षात आलंच असेल. सीरिज न पाहणाऱ्यांसाठी स्टॅजचं भारतीय असणं आणि गेम ऑफ थ्रोन्समध्ये भारतीय त्यातही केरळशी नाळ जोडल्या गेलेल्या अभिनेत्याचं असणं तितकंच रंजक ठरत आहे. 



सीरिजच्या शेवटच्या पर्वानंतर आणि 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या अध्यायाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर स्टॅजने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहिली. ज्या माध्यमातून त्याने या सीरिजसाठी कोणत्याही पद्धतीत, परिस्थितीत त्याच्या पाठिशी उभं राहणाऱ्या प्रत्येकाचेच आभार मानले. या सीरिजच्या निमित्ताने आपल्याला भारतीय संस्कृतीशी पुन्हा जोडलं जाण्याची संधी मिळाली, असं म्हणत मायभूमी केरळकडूनही आपल्याला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्याने कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. प्रत्येक मल्याळी आणि भारतीय प्रेक्षकांचे त्याने आभार मानले. आहे की नाही GOT चं केरळी कनेक्शन खास? स्टॅजची ही पोस्ट पाहता, 'मच्चा..... रॉक्स' असंच म्हणावं लागेल.