‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अभिनेत्यावर कोसळले आर्थिक संकट, म्हणाला `माझ्याकडे घरभाडे देण्यासाठीही...`
कलाकारांचे आयुष्य हे असंच असते. जेव्हा ते काम करत असतात, तेव्हा सर्व काही व्यवस्थित असते. पण जेव्हा त्यांच्याकडे काम नसते, तेव्हा अचानक सर्व काही संपून जाते, असेही ते म्हणाले.
Yeh Rishta Kya Kehlata Hai Actor Financial Crisis : छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही लोकप्रिय मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमुळे अनेक कलाकार घराघरात पोहोचले. याच कार्यक्रमामुळे अभिनेते संजय गांधी प्रसिद्धीझोतात आले. संजय गांधी यांनी या मालिकेत महेंद्र प्रताप सिंघानिया ही भूमिका साकारली होती. पण आता संजय गांधी हे आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत. नुकतंच एका मुलाखतीत संजय गांधी यांनी याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.
"मी वाईट परिस्थितीतून जात आहे"
संजय गांधी यांनी 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत 2009 ते 2012 यादरम्यान मालिकेत झळकले. त्यांना दादाजी या नावानेच लोकप्रियता मिळाली. आता सध्या ते झनक या मालिकेत काम करत आहेत. यानिमित्ताने नुकतंच त्यांनी एक मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, "कलाकारांचे आयुष्य हे असंच असते. जेव्हा ते काम करत असतात, तेव्हा सर्व काही व्यवस्थित असते. पण जेव्हा त्यांच्याकडे काम नसते, तेव्हा अचानक सर्व काही संपून जाते. मी आता एका मालिकेत काम करत असलो, तरीदेखील मी वाईट परिस्थितीतून जात आहे."
"ते मला थेट सांगू शकले असते"
"मी जेव्हा झनक ही मालिका केली, तेव्हा मला सांगण्यात आले होते की सुरुवातीला फक्त 20 सीन शूट करायचे आहेत. त्यानंतर दोन महिन्यांचा ब्रेक असेल. त्यानंतर मग माझे पात्र मालिकेचा महत्त्वाचा भाग बनले. पण गेल्या 9 महिन्यांपासून आतापर्यंत मी फक्त 20 दिवस शूटींग केले आहे आणि आता मी माझा ट्रॅक पुन्हा सुरु होण्याची वाट बघत आहे. मला त्यांच्याकडून मे महिन्यापासून कोणतेही अपडेट मिळालेले नाही. जर त्यांना माझी गरज नसेल, तर ते मला थेट सांगू शकले असते. जेणेकरुन मला इतर प्रोजेक्ट करता आले असते", असे संजय गांधी यांनी सांगितले.
"घर गहाण ठेवण्याच्या विचारात"
"एक अभिनेता म्हणून हे सर्व खूप कठीण आहे. मला या शहरात स्वत:ची ओळख जपण्यासाठी पैशांची गरज आहे आणि माझ्याकडे आता उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नाही. कोव्हिड दरम्यान माझी बचतही संपली. मी आता अंधेरीत भाड्याच्या घरात राहतो आणि मला माझे घरभाडे देण्यासाठी इतर मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागतात. मी माझे मीरारोडमधील घर गहाण ठेवण्याच्या विचारात आहे. कारण मला पैशांची नितांत गरज आहे. मला एक नवीन प्रोजेक्ट हवा आहे. काही दिवसांपूर्वीच मी झनक मालिका सोडली आणि आता मला आशा आहे की यापुढे नक्कीच काहीतरी चांगले होईल", असेही संजय गांधी यांनी म्हटले.