Rangbaaz Trailer : २५ व्या वर्षी २० हून जास्त मर्डर करणारा `तो` येतोय तुमच्या भेटीला
चित्रपटांना टक्कर देत त्याच तोडीच्या कथानकांना प्रेक्षकांसमोर अगदी प्रभावीपणे साकरत काही कलाकारांनी त्यांचा मोर्चा वेब सीरिज विश्वाकडे वळवला आहे.
मुंबई : चित्रपटांना टक्कर देत त्याच तोडीच्या कथानकांना प्रेक्षकांसमोर अगदी प्रभावीपणे साकरत काही कलाकारांनी त्यांचा मोर्चा वेब सीरिज विश्वाकडे वळवला आहे. 'नार्कोज', 'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर' अशी कित्येक नावं हल्ली तरुणाईकडून ऐकायला मिळतात. किंबहुना या साऱ्या वेब सीरिजची जादूच हल्लीच्या तरुणाईवर झाली आहे. यातच आता आणखी एका नावाची भर पडत आहे.
प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या नव्या वेब सीरिजचं नाव आहे, 'रंगबाज'. 'झी ५' च्या ओरिजिनल सीरिजपैकी एक असणाऱ्या 'रंगबाज'चे ट्रेलर सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहेत. गुन्हेगारी, गुंडगिरी आणि राजकारण विश्वावर भाष्य करणारे हे ट्रेलर अनेकांचच लक्ष वेधत आहेत. साकिब सलीम, तिग्मांशू धुलिया, रणवीर शौरी यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका असल्याचं पाहायला मिळत आहे.
'रेस ३' मधून झळलेला अभिनेता साकिब सलीमही यात झळकत असून, त्याच्या अभिनयाची एक वेगळी बाजू या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तो 'रंगबाज'मध्ये 'शिव प्रकाश शुक्ला' हे पात्र साकारत असून, त्याची गडद छटा कलाविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.
९० च्या दशकात उत्तर प्रदेश भागात उदयास आलेलं गुंडाराज आणि त्याचे एकंदर परिणाम, राजकारण, संरक्षण यंत्रणांशी त्यांचा असणारा वाद आणि या साऱ्याचा उत्तर प्रदेशवर होणारा परिणाम अशा गोष्टींवर रंगबाजमधून प्रकाशझोत टाकण्यात येत आहे.
२२ डिसेंबरला ही वेब सीरिज प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असून, आता त्याला प्रेक्षकांची पसंती मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'काम ऐसा करो की सब देखे और हमेशा याद रखे', अशा संवादांमुळे आतापासूनच 'रंगबाज'विषयीच्या बऱ्याच चर्चांनी तरुणाईच्या वर्तुळात जोर धरला आहे.
कला दिग्दर्शक निशिकांत कामत आणि दिग्दर्शक भाव धुलिया यांनी साकारलली ही वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर' या कलाकृतींचं आव्हान कुठवर स्वीकारते आणि त्यातूनही प्रेक्षक वर्गात आपली ओळख प्रस्थापित करते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.