मुंबई : “दिवाळी अंकाची एक मोठी परंपरा फक्त मराठी साहित्यात आहे. आपलं साहित्य, संस्कृती , कला क्षेत्र समृद्ध करण्याचं काम दिवाळी अंक करतात. आजच्या डिजीटल युगात, टीव्हीच्या युगात वाचनसंस्कृती हरवत चालली असल्याचं अनेकजण बोलतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशावेळी झी मराठीसारखी एक प्रतिथयश वाहिनी दिवाळी अंक घेऊन येतेय हे उल्लेखनिय आहे. यानिमित्ताने दिवाळी अंकाला एक वेगळं वलय मिळेल आणि दिवाळी अंकाची परंपरा जपली जाईल. ही परंपरा जपणं आपल्या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे” असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा श्री. राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. 


निमित्त होतं झी मराठी वाहिनीच्या ‘उत्सव नात्यांचा’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचं. मुंबईतील भाईदास सभागृहात हा प्रकाशनाचा सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी अंकाचे संपादक प्रशांत दळवी, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, इंडिया प्रिंटीग प्रेसच्या राधिका लिमये, झी मराठीच्या क्लस्टर हेड शारदा सुंदर आणि सौमिल क्रिएशन्सचे सुनिल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. झी मराठी वाहिनीला अठरा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजवरच्या प्रवासातील मालिकांच्या शीर्षक गीतांनी सजलेला ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात हे दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. येत्या शनिवारी, ३० सप्टेंबरला सायंकाळी ७ वा. हा सोहळा झी मराठी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.


झी मराठी वाहिनीने नुकताच आपला अठरा वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. या प्रवासात अनेक मालिका आल्या , अनेक व्यक्तिरेखा आल्या आणि या सा-यांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ज्याप्रमाणे या मालिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या त्याच प्रमाणे लक्षात राहिली ती मालिकांची शीर्षकगीते. आजही आभाळमाया, वादळवाट या मालिकांची गीतं प्रेक्षकांच्या ओठांवर रुळलेली आहेत. या प्रत्येक गाण्यामागे एक गोष्ट दडलेली आहे. ती गोष्ट प्रेक्षकांच्या समोर यावी, त्या आठवणींना उजाळा मिळावा या हेतूनेच ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये ‘आभाळमाया’पासून ते आजच्या ‘लागिरं झालं जी’ पर्यंतच्या अनेक मालिकांचे शीर्षक गीतं मान्यवर गायकांनी सादर केली. 


यामध्ये रविंद्र साठे, बेला शेंडे, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, माधुरी करमरकर, जान्हवी प्रभू अरोरा, आनंदी जोशी, रोहित राऊत, किर्ती किल्लेदार, सावनी रविंद्र,संदीप उबाळे, जयदीप वागबावकर, मधुरा कुंभार, मंगेश बोरगावकर, प्रविण कुंवर आदी गायकांचा समावेश होता. यावेळी गीतकार मंगेश कुलकर्णी यांनी ‘आभाळमाया’, ‘मानसी’, ‘वादळवाट’ या मालिकांच्या शीर्षकगीतांच्या निर्मितीची गोष्ट सर्वांना सांगितली. बसमधून प्रवास करत असतांना बसच्या तिकीटावर लिहिलेलं आभाळमायाच्या गाण्याचा किस्सा सांगितल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. याशिवाय अशोक पत्की यांनी गाण्यांच्या निर्मितीचे किस्सेही सांगितले. या कार्यक्रमादरम्यानच झी मराठीच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.


कार्यक्रमांचं सुत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी केलं तर लेखन श्रीरंग गोडबोलेंनी तर दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केलं. झी मराठीच्या अठरा वर्षांच्या आठवणींना उजाळा देणारा हा ‘नक्षत्रांचे देणे’ येत्या शनिवारी ३० सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीसह झी मराठी एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे