`हॅम्लेट` झी मराठीची पहिली नाट्य प्रस्तुती
साडे चारशे वर्ष रसिकमनांवर गाजवलं अधिराज्य
मुंबई : विल्यम शेक्सपिअर म्हणजेच मानवी जीवनातील भावनिक कल्लोळ भेदकपणे मांडणारी लेखणी, साहित्यप्रेमींच्या मनावर गारुड घालणारी लेखनशैली आणि जगभरातील कित्येक नाट्यकर्मींना भुरळ पाडणारं झपाटून टाकणारं लिखाण...! जागतिक रंगभूमीवरील या अढळ ताऱ्यांनं गेली साडे चारशे वर्ष रसिकमनांवर आपल्या अद्भुत लेखणीने अधिराज्य गाजवले आहे. मराठी नाट्यरसिकही त्याला अपवाद नाहीत. राम गणेश गडकरी ते कुसुमाग्रजांपर्यंत मराठी लेखक आणि नाटककारांमध्ये विल्यम शेक्सपिअरचा प्रभाव ठळकपणे जाणवला आहे. मराठी नाट्य रसिकांच्या जुन्या पिढ्यांनी मराठी रंगभूमीवर 'शेक्सपिअर' अनुभवला आहे, आता नव्या पिढीला 'शेक्सपिअर'चा विलक्षण अनुभव देण्यासाठी महाराष्ट्राची महावाहिनी झी मराठीने पुढाकार घेतला आहे.
इंग्रजी रंगभूमीवर अजरामर ठरलेले 'विल्यम शेक्सपिअर' लिखित 'हॅम्लेट' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य झी मराठी वाहिनीने उचलले आहे. नाना जोगांनी मराठी रूपांतर केलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तुषार दळवी, सुनील तावडे, भूषण प्रधान, आशिष कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, रणजीत जोग, मनवा नाईक, मुग्धा गोडबोले असे दिग्गज कलाकार यात आपल्याला दिसणार आहेत आणि 'हॅम्लेट'ची प्रमुख भूमिका 'सुमित राघवन' साकारणार आहे.
'हॅम्लेट' म्हणजे विल्यम शेक्सपिअरच्या साहित्याचा मुकुटमणी. जगभरातील नाटककारांना आकर्षित करणारी ही अजरामर शोकांतिका! फक्त नाट्य निर्मात्यांना नव्हे तर नाट्य समीक्षकांनाही अचंबित करणारी ही कलाकृती. मराठी नाट्यरसिकांसाठी हा विलक्षण नाट्यानुभव सादर करणारे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी याप्रसंगी म्हणाले, “कालातीत अशी ओळख असलेले 'हॅम्लेट' नाटक साकारावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. सध्या मराठी रंगभूमीवर समृद्धीचं वातावरण असून नवनवे विषय हाताळले जात आहेत. त्यामुळे आमच्या या कलाकृतीला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री बाळगतो.”
६० वर्षांपूर्वी नाना जोग, दामू केंकरे यांनी केलेल्या या नाटकाचे पुनर्लेखन 'प्रशांत दळवी' यांनी केले आहे, तर नाटकाला संगीत दिलं आहे ‘राहुल रानडे’ यांनी. प्रदीप मुळ्ये यांनी साकारलेलं डोळे दिपवणारं नेपथ्य, कालानुरूप वेशभूषा आणि हटके प्रकाशयोजना ही या नाटकाची जमेची बाजू ठरणार आहे. दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांनी या भव्यदिव्य नाट्यनिर्मितीचा डोलारा सांभाळला आहे.
मराठीत प्रथमच कधीही न पाहिलेला निर्मितीमूल्य कलाकार संच, विदेशी धाटणीचं संगीत, वेगळ्या स्वरूपाची प्रकाश योजना, हि या नाटकाची वैशिष्ट. मराठीत या प्रकारची निर्मिती पहिल्यांदाच होत असून झी मराठी हे स्वप्न घेऊन येत आहे. हॅम्लेटच्या शुभारंभाचा प्रयोग २७ एप्रिल २०१८ रोजी रात्री ८ वा. रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. आणि दुसरा प्रयोग २८ एप्रिल रोजी रात्री ८ वा. रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे.‘टू बी ऑर नॉट टू बी…’ असं म्हणणारा शेक्सपिअरचा हॅम्लेट 'झी मराठी'च्या नाट्यनिर्मितीद्वारे रंगभूमीवर दाखल होणार असून नेहमी काहीतरी वेगळं करणाऱ्या आणि प्रेक्षकांची पसंती लक्षात घेऊन त्यांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या झी मराठी वाहिनीचा हा प्रयोग देखील यशस्वी होईल यात काहीच शंका नाही.