निवडणुकीपर्यंत `पीएम मोदी`च्या प्रदर्शनाला स्थगिती
निवडणुक आयोगाने सर्व चर्चांना पूर्ण विराम दिले आहे
मुंबई : 'पीएम मोदी' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून भलताच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. पण निवडणूक आयोगाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशभरात राजकीय वतावरण चांगलेच उफाळून निघाले आहे. उद्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'पीएम मोदी' चित्रपट भलताच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मंगळवरी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने कोणतेही भाष्य करण्यास नकार दिलेला होता. निवडणूक आयोगाने पुढील निर्णय घ्यावा, असे सांगत न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपावली होती.
निवडणुकीच्या काळात आचार संहिता उल्लंघन होतयं की नाही, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. तर हा चित्रपट लोकसभा निवडणुकी नंतर कधी रूपेरी पडद्यावर दाखल होईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 'पीएम मोदी' चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतू विरोधी पक्षांच्या आक्षेपामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबत चालली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ११ एप्रिलला 'पीएम मोदी' प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. परंतू आता निवडणुक आयोगाने सर्व चर्चांना पूर्ण विराम दिले आहे.