मुंबई: यंदाचा पावसाळा राज्यासाठी संमिश्र ठरत आहे. वातवरणातील बदल आणि लहरी वरूणरामुळे राज्याच्या पर्जन्यवृष्टीत असमतोल निर्माण झाला. राजधानी मुंबईसह उपराजधानी नागपूर आणि उर्वरीत महाराष्ट्रातील काही शहरं आणि गावांमध्ये पाणी घुसले. नद्यांना पूर आले. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. या सर्वांचा परिणाम राज्यात पाणीसाठा करणाऱ्या धरणांवर झाला आहे. राज्याचा मोठा भाग आजही कोरडाठाक असला तरी, काही धरणे मात्र पूर्ण क्षमतेने भरली आहेत. ओसंडून वाहत आहेत. काही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमिवर राज्यांतील धरणांमधील पाणीसाठा आणि त्यांची सद्यस्थिती यावर टाकलेला हा एक कटाक्ष...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, ते ओसंडून वाहत आहे. त्यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी धरणाचे तीन दरवाजे उघडावे लागले आहेत. या दरवाजातूनच अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता यंदातरी मिटल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसत आहे.


विहार तलावही ओव्हरफ्लो 


मुंबईच्या पाणीपुरवठ्यात मोलाची भर टाकणारा विहार तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे.  विहार तलावाची क्षमता २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर्स इतकी आहे. तुलसी, मोडकसागरनंतर आता मुंबईतला विहार तलावही भरून वाहू लागला आहे.


मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाणी प्रश्न मिटण्याच्या मार्गावर


दरम्यान, राज्यातील बहूतांश भाग हा पावासाविणा कोरडाठाक असला तरी, काही भागात मात्र पाऊस समाधानकारक पडला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणं भरू लागली आहेत. नाशिक जिल्ह्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याच्या मार्गावर आहे. नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. तर पूणे शहराचाही पाण्याचा प्रश्न मिटलाय. खडकवासला धरणातून पाणी सोडायला सुरूवात झालीय. मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर, विहार, तानसा हे तलाव भरून वाहू लागलेत. तर पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पिंपरी चिंचवडकर सुखावलेत.


खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग


पुण्यातल्या खडकवासला धरणातूनही पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेले काही दिवस धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होतेय. टेमघर, वरसगाव, पानशेत तसंच खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो. या चारही धरणात मिळून ५९.७६ % पाणीसाठा झालाय. टेमघर धरण ४६.९१%, पानशेत ७३.४८, वरसगाव ४६.०८% तर खडकवासला धरण ९९.१६ % भरलंय. त्यामुळं त्यातून पाणी सोडण्यात येतंय. धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहिला तर सगळी धरणं लवकरच भरतील. पुणेकर आणि लाभक्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थानं आनंदाची बातमी आहे.


पवना धरणाचा पाणीसाठा ६३.१६ टक्क्यांवर


पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणी साठा जवळपास ६३.१६ टक्क्यांवर पोहचलाय. धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात १२४ मिलिमिटर पाऊस पडलाय... नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पिंपरीतून जाणाऱ्या पवना नदीचं मनमोहक रूप पाहायला मिळतंय..दुथडी भरून वाहणाऱ्या पवना माईचं पात्र सध्या विलोभनीय दिसतं...


गंगापूर धरणातून विसर्ग


जून महिन्यापासून नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. अखेर ती संपलीय. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारी जोरदार पर्जन्यवृष्टी आणि शहरात दिवसभर कोसळणाऱ्या दमदार संततधारेने गोदावरी यावर्षी पहिल्यांदा दुथडी भरून वाहताना नाशिककरांना पाहायला मिळाली. दुपारनंतर गोदावरीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली होती. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग, शहरातील पावसाचे पाणी उपनद्या, नाल्यांमधून येणारे पाणी यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी प्रचंड वाढली होती. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांकडून नदीकाठालगत सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहे.


कोयना धरणाच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ..


महाराष्ट्राची वरदायिनी असणाऱ्या कोयना धरण क्षेत्रात गेले ७ दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झालीय. धरणात आज मितीला ७४  टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात ५.६९ टीएमसीने, तर पाणी उंचीत ६.३ फुटांनी वाढ झाली आहे. धरणात ७४ टीएमसी पाणीसाठा झाल्याने आगामी काळातील उपाययोजनांच्या पार्श्‍वभूमीवर येत्या दोन दिवसांत धरणातून पूर्वेकडे पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.