२०१७ ला थेट रायगडावरून निरोप देताना ...
२०१७ या वर्षाला निरोप देऊन रायगडावर २०१८ या नवीन वर्षाचा नवा संकल्प करता आला.
दिपाली देवकर, कल्याण : आपलं थर्टीफस्ट सेलिब्रेशन जरा हटके असावं असं प्रत्येकाला वाटत असत. मी देखील त्याला अपवाद नाही. पण यंदाच थर्टी फर्स्ट इतका आनंद देईल अस वाटल नव्हतं, कारण एमपीएससी क्लासच्या ग्रुपसोबत रायगड सफर करण्याच स्वप्न यावेळी प्रत्यक्षात सकारल गेलं.
२०१७ या वर्षाला निरोप देऊन रायगडावर २०१८ या नवीन वर्षाचा नवा संकल्प करता आला.
थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन
३१ डिसेंबर या दिवशी सार्वजनिक ठिकाणे,हॅाटेल,मॉल्स, पर्यटन स्थळ आणि विविध ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुण वर्गांची गर्दी दिसते. गाणे,डान्स,पार्टी याद्वारे प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने मौजमजा करत असतात. मग मी मागे कसे राहणार ?
मी सुध्दा यंदाच थर्टीफस्ट जोरात आणि धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्धार केला होता. दरम्यान क्लासच्या मनोहर सरांनी थर्टीफस्टसाठी रायगड किल्यावर स्वच्छता करण्याचा आगळावेगळा प्लान आमच्या समोर ठेवला.
थर्टीफस्ट आणि स्वच्छता ?
मला प्रश्न पडला थर्टीफस्ट आणि स्वच्छता यांचा काही संबंध आहे का ? पण रायगड हा किल्ला मी पहिल्यादाचं पाहणार असल्याने मी सुध्दा रायगडला जाण्याचे ठरवलं. मग काय ३० डिसेंबर २०१७ या दिवशीचे औचित्य साधून रायगडवर ३०० विद्यार्थीवर्ग आणि शिक्षकांनी रायगडावर जाण्याची तयारी सुरु केली.
आम्ही सर्वजण कल्याण वरुन रात्री १ वाजता रायगडच्या दिशेने निघालो. सकाळी ६.३० रायगडावर पोहोचलो. सफेद कुर्ता,जीन्स,डोक्यावर फेटा अशा पेहरावात आम्ही सर्वजण मावळेच झालो. हीच प्रेरणा घेऊन सकाळी १०.३० वा गड चढण्यासाठी प्रस्थान केले.
गढ चढताना ‘जय भवानी जय शिवाजी ’ अशा घोषणा देताना अंगातील रक्त सळसळत होतं. अंगात अद्भूत शक्ती संचारल्यासारखे वाटत होतं. गडावरील वातावरणही प्रसन्न होते.
महाराष्ट्राच्या या पावन भूमीत फेटे बांधून आम्ही पुढे पुढे जाऊ लागलो. गडावरील प्रत्येक ठिकाणची माहिती सांगण्यासाठी गाईड गणेश गोरे आमच्यासोबत होते. त्यांच्या तोंडून माहिती ऐकताना जणू या गडावर घडलेला इतिहास आम्ही प्रत्यक्ष अनुभवतोय अस वाटत होत.
रायगडाचा मजबूत बांधा
किती पायत्या आहेत याचा मनात न आणता रायगडाच्या टोकावर पोहाचयेच हाच उद्देश मनात होता. रायगड हा किल्ला डोंगराळ, निसर्गरम्य परिसरात वसलेला आहे. शिवकालात कोणत्याही सोयीसुविधा नसताना, कोणतेही तंत्रज्ञान नसताना प्रत्येक वास्तूची बांधणी,मांडणी रेखीव व सुबक कशी काय ? असा विचार मनात येत होता.
रायगडाचा मजबूत बांधा
एकीकडे बऱ्याच ठिकाणी दुष्काळ आणि पाण्याची वणवण असताना गंगासागर तलावत अजून देखील पाणी आहे. हे विषेश. गडावरील तट आणि अनेक भाग अजून देखील जसेच्या तसे मजबूत आहेत. नाना दरवाजा, महादखाना, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, महाराजांची समाधी, बाजारपेठ पाहताना असे वाटत होते की महाराज आज देखील रायगडावरच आहेत.
या साऱ्या गोष्टी पाहत आम्ही घोषणा द्यायचो तेव्हा गडावर, संपूर्ण आकाशात एकच आवाज घुमायचा, 'जय भवानी, जय शिवाजी'.
सांगलीतून रोज येतो पुष्पहार
आपल्या शहरातील पुतळ्यांची स्वच्छता, निगराणी कधी होताना दित नाही. जयंती किंवा पुण्यतिथी शिवाय त्या पुतळ्यांना कधी हार ही घातलेला नसतो. पण रायगडावर एक अनोखी परंपरा आहे. महाराजांच्या सिंहासनावरील मुर्तीसाठी सांगली येथून दररोज हार येतो. हे महाराजांवरील भक्तीचे प्रतिक आहे.
एक खंत
रायगडाच सर्व निरीक्षण करत असताना एक खंत मात्र प्रकर्षाने जाणवते. गडावर येणारे बरेचशे लोक हे महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जाणून घेण्यासाठी नाही तर फक्त पर्यटनाच्या दृष्टीनेच येतात. प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांचे पाकिटे गडावरच टाकून देतात. यामुळे गडाचा परिसर अस्वच्छ होतो.
हे सर्व पाहून मन अस्वस्थ झालं. गड, किल्यांवर जाताना कधीही कचरा करणार नाही या गोष्टीची शपथ आम्ही घेतली.
४०० वर्षापासून हे गड, किल्ले भक्कम बांधणीमुळे आज आपणास पाहायला मिळतात. पण पुढील ४०० वर्षानंतर, पुढील पिढीला हे गड, किल्ले प्रत्यक्षात पाहता येतील का ? हा प्रश्न मनाला सतावत राहतो. गड,किल्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होतयं.
फक्त पुस्तकातंच
छत्रपतींचा इतिहास, त्यांच कर्तृत्व, जनतेसाठी त्यांची असणारी दुरदृष्टी याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. यासाठी गड, किल्ल्यांना भेटी देणं, त्यांची काळजी घेणे गरजेचं आहे. नाही तर गड आणि किल्ले हे काही वर्षांत फक्त पुस्तकातंच पाहायला मिळतील हे खेदाने नमूद करावस वाटत.