आपले पूर्वज नाश्ता राजासारखा करावा असं का म्हणायचे?; जाणून घ्या नाश्ता करण्याचे `हे` सर्वात मोठे फायदे..
Breakfast Benefits: सकाळी भरपेट नाश्ता करणं का गरजेचं असतं?; या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या
Morning Breakfast Benefits in Marathi: सकाळचा नाश्ता राजासारखा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे करावे, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. यावरुनच सकाळी भरपेट नाश्ता करणे किती गरजेचं असतं हे अधोरेखित होईल. दिवसाची सुरुवात ही सकस आहाराने करावी. कारण दिवसभर लागणारी शक्ती व उर्जा या न्याहारीतून मिळते. आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता हा अत्यंत लाभदायक असतो. जर तुम्ही सकाळी नाश्ता करणे टाळत असाल त्याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होतात. कमी वयात गंभीर आजारांचा सामनाही करावा लागू शकतो. त्यामुळं उत्तम आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता करणे गरजेचे आहे.
सकाळी भरपेट नाश्ता करण्याचे फायदे
ब्रेकफास्ट या शब्दाची फोड केल्यास ब्रेक- द फास्ट असा अर्थ होतो. म्हणजेच रात्रभर उपवास केल्यानंतर आपण काहीतरी खातो म्हणजेच आपण उपवास संपवतो. म्हणूनच शरीरासाठी सकाळी सकस अन्न गरजेचं असते. योग्य प्रमाणात व योग्य पोषणमूल्य असलेला नाश्ता केल्यास स्मरणशक्ती व आकलनशक्ती चांगली राहते. सकाळी पोषणयुक्त आहार घेतल्यास शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसंच, मधुमेह, हृदयाचे विकार, वजन नियंत्रणात राहते.
कॅलरीज कमी होतात
सकाळी न्याहारी केल्याने मेटाबॉलिजम वाढते. त्यामुळं दिवसभर शरीरातील कॅलरीदेखील बर्न होतात आणि तुम्हाला दिवसभर उर्जा मिळते. तसंच, दिवसा नाश्ता करण्यास विसरलात तर त्याचा तुमच्या कामावरदेखील परिणाम होतो.
मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत
रोज नाश्ता केल्यास मधुमेह नियंत्रित राहण्यासही मदत होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहते. सकाळची न्याहारी फळ, धान्य आणि प्रथिनेयुक्त असावी.
थकवा जाणवणार
नाश्ता न केल्यास दिवसभर तुम्हाला थकवा जाणवेल. पूर्ण आठ तासांची झोप पूर्ण केल्यानंतरही तुम्हाला आळस व थकवा जाणवेल.
मुलांनाही लावा नाश्ताची सवय
सकाळी लवकर उठून शाळेत जाणारी मुलं घाईघाईत नाश्ता करन जात नाही. त्यामुळं त्याचे हिमोग्लोबिन कमी असते. त्यामुळं त्यांना शाळेत शिकवलेले आकलन करायला त्रास होतो. तसंच, विसरण्याची सवयही लागू शकते. म्हणून मुलांना नाश्ताची सवय लावणे गरजेचे आहे.
नाश्तांमध्ये काय खावे
सकाळी नाश्तामध्ये ब्रेड-बटर, चहा- चपाती किंवा चहा बिस्किट असे पदार्थ खात असाल तर आत्ताच ही सवय बदला. नाश्तामध्ये पारंपारिक नाश्ताच्या पदार्थाचा समावेश करावा. पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, थालीपीठ, नाचणीची उकड. त्याचबरोबर, नाचणीचे आंबील, घावणे, आंबोळी, नाचणी सत्त्व, बाजरीचे धपाटे, लापशी असे पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये वापरु शकता.