मुंबई : कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मुंबईत काही प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरत असल्याचं दिसत होतं. मात्र अशात आता लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचं धक्कादायक गोष्ट समोर आली आहेत. 9 वर्षांखालील मुलांना कोविडची लागण झाल्याचं निदर्शनास आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत 14 हजार लहान मुलांना कोरोना झाल्याचं उघड झालं आहे. मुंबईत 9 वर्षांखालील लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आल्यावर मुलांच्या लसीकरण चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र यासाठी मुलांचे पालक फारसा पुढाकार घेत नसल्याचंही समोर येतंय. 


जून महिन्यात मुंबई महानगरपालिकेने सेरो सर्व्हे केला होता. त्यावेळी या सर्व्हेक्षणानुसार, 2 हजारांहून अधिक लहान मुलांची तपासण्यात आली होती. या सेरो सर्वेक्षणात 51.18 टक्के मुलं कोरोनाच्या संपर्कात आल्याचं आढळलं होतं.


दरम्यान पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांचं कोरोना बाधित होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे.


लस चाचणीला 10 मुलांची नोंदणी


मुंबई महापालिकेच्या नायर रूग्णालयात 2 ते 11 वयोगटातील मुलांसाठी लस चाचणी सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत 10 मुलांची नोंदणी करण्यात आली आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, सध्या रुग्णालयात लस चाचणीविषयी चौकशी करण्यासाठी पालकांचा प्रतिसाद दिसून येतोय.