पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी रोज सकाळी करा या `४` गोष्टी!
काही लहान सहान सवयी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
मुंबई : काही लहान सहान सवयी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आरोग्याच्या अनेक समस्या या पोटाशी संबंधित असतात. पोट स्वस्थ असेल तर व्यक्तीही स्वस्थ राहील. पचनतंत्र सुधारण्यासाठी काही सवयी उपयुक्त ठरतात. आजकालच्या धावपळीच्या जीवनमानात आरोग्याकडे पुरेसे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. पण सकाळचा थोडासा वेळ आरोग्यासाठी दिल्यास तुम्ही स्वस्थ राहाल.
सकाळी उठल्यानंतर जीवनशैलीत या सवयींचा अंतर्भाव केल्यास पचनक्रिया हेल्दी व सुरळीत राहील. पाहुया कोणत्या आहेत त्या ४ सवयी...
पाणी
सकाळी उठल्यावर २ ग्लास पाणी प्या. ही सवयच स्वतःला लावून घ्या. सकाळी उठल्यानंतर शरीराला पाण्याची आवश्यकता असते. सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते. मेंदू सक्रिय होतो आणि पोट साफ होण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर तुम्ही पाण्यात लिंबू पिळूनही घेऊ शकता.
योग आणि ध्यान
सकाळी उठल्यावर शरीर काहीसे स्थिर झालेले असते. त्याला स्ट्रेचिंगची गरज असते. त्यासाठी रोज सकाळी चालायला जा. नियमित व्यायाम करा. योगसाधना केल्यास खूप फायदा होईल. शारीरिक-मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होईल. ध्यानामुळे मेंदूच्या नसा सक्रिय होतात आणि दिवसभराच्या तणावापासून मुक्ती मिळते.
पोटाला मसाज
सकाळी उठल्यावर व्यायामाबरोबरच पोटाला मसाजही करा. पोटाला हलक्या हाताने मसाज केल्याने पचनतंत्र सुधारते.
नाश्ता
सकाळी उठल्यानंतर कामाच्या धावपळीत नाश्ता करणे टाळू नका. कारण त्यामुळे स्थुलता वाढू शकते आणि लठ्ठपणामुळे आरोग्याच्या इतर अनेक समस्यांना निमंत्रण मिळते. त्यामुळे सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. संतुलिन आणि पोषकघटकांनी युक्त असा नाश्ता करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. नाश्त्यात फायबर आणि प्रोटीन योग्य प्रमाणात असायला हवे.