मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. अशातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन देखील जगभराची चिंता बनली आहे. हा व्हेरिएंट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याच म्हटलं जातंय. त्यामुळे आता मुलांचं लसीकरण कधी होणार याबाब विचारणा होतेय. मात्र लवकरच देशात मुलांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांच्या लसीकरणाबाबत डिसेंबरअखेरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. डिसेंबरअखेर केंद्र सरकार लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेणार आहे. यावेळी हायरिस्क झोनमधील लोकांना बूस्टर डोस तसंच इम्युनिटी कमी असलेल्यांना अतिरिक्त डोस देण्याबाबत निर्णय होणार आहे. 


सध्या अधिकाधिक लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ओमायक्रॉनबाबतचं चित्रंही स्पष्ट होईल. बूस्टर डोसचा निर्णय हा शास्त्रीय आधारावरच होईल. नव्या व्हेरियंटवर हा निर्णय होणार नाही असं सांगण्यात येतंय. 


आसीएमआरच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, मुलांसाठीच्या लसी कमी असल्यामुळे तातडीने निर्णय होण्याची शक्यता धूसर आहे. बूस्टर डोस, लहान मुलांना लस आणि कमी इम्युनिटी असलेल्या नागरिकांना अतिरिक्त डोस यात अतिरिक्त डोसला प्राधान्य दिलं जाईल.


दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढील सहा महिन्यांत मुलांसाठी कोविड-19 लस आणण्याची योजना आखली आहे. कंपनीचे सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 


पूनावाला म्हणाले की 'कोवोवॅक्स' लस चाचणीत आहे आणि ती तीन वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना सर्व प्रकारचे संरक्षण प्रदान करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध होऊ शकते. त्यांनी पुढे सांगितले की चाचणीचे उत्कृष्ट आकडे पाहिले गेले आहेत.