मुंबई : मुंबईतील एका १५ वर्षीय लहान मुलाच्या फुफ्फुसातून 16 सेंटिमीटरचा ट्यूमर काढण्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, एखाद्या फुटबॉलच्या आकारा इतकी ही गाठ मोठी होती. या गाठीचे वजन १.५ किलो इतके होते. या शस्त्रक्रियेमुळे मुलाचे प्राण वाचले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भायखळा मध्ये राहणारा प्रतीक बरकडे या मुलाच्या उजव्या छातीच्या पोकळीत १६ सेंटिमीटर इतक्या मोठ्या आकाराची सुमारे दीड किलो वजनाची गाठ होती. ही गाठ एखाद्या फुटबॉल इतकी मोठी होती. या गाठीला सॉलिटरी फ्रायबर ट्यूमर असे म्हणतात. या मुलाला छातीत दुखणं, दम लागणं, खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला होता. ही कोविड-19 ची लक्षणं असल्याने कुटुंबियांना तातडीने वोक्हार्ट रूग्णालय गाठले. याठिकाणी छातीचा सीटीस्कॅन करण्यात आला. या वैद्यकीय चाचणी अहवालात फुफ्फुसात गाठ असल्याचं निदान झालं. हा ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचं डॉक्टरांना सांगितले.


मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिस सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे.



सध्या कोरोनाच्या भितीपायी अनेक रूग्ण रूग्णालयात उपचारासाठी येणं टाळत आहेत. त्याचप्रमाणे प्रतिकवरही वेळेवर उपचार न झाल्याने त्याच्या वयाबरोबर ट्यूमर वाढत होता. हा ट्यूमर फुटबॉलच्या आकारा इतका मोठा झाला होता. या गाठीमुळे फुफ्फुसे, श्वसननलिका व हदय यावर विपरित परिणाम होऊ लागला होता. यासाठी शस्त्रक्रिया करणं फार गरजेचं होतं. त्यानुसार डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करून रूग्णाचे प्राण वाचवल्याते याबाबत माहिती देताना डॉ. भालेराव यांनी सांगितले.


'फुफ्फुसात आढळून येणारे हे ट्यूमर अतिशय दुर्मिळ असते. धुरामुळे होणाऱ्या संसर्गामुळे हा त्रास उद्भवू शकतो. यावर शस्त्रक्रिया हा एकच पर्याय असल्याचे ते पुढे म्हणाले.


आमच्या मुलाला श्वास आणि खोकला येत होता पण त्यामागील कारण आम्हाला समजू शकले नाही. कोविड १९ च्या भितीपायी आम्ही रूग्णालयात येणं टाळत होतो. फुफ्फुसात ट्यमूर असल्याचं ऐकल्यावर आम्हाला धक्काच बसला. पण वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच निदान व शस्त्रक्रिया करून माझ्या मुलाचे प्राण वाचवले आहे. आता प्रतिकच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो पूर्वीप्रमाणं सामान्य आयुष्य जगू लागल्याचे प्रतीकचे वडील मयूर बरकडे यांनी सांगितले.