कोमात असलेल्या महिलेने दिला बाळाला जन्म; डॉक्टरही हैराण
कोरोनाने ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलेने कोमामध्येच मुलाला जन्म दिला.
दिल्ली : कोरोनाने गेल्या वर्षी संपूर्ण जगात कहर केला. लाखो लोकांनी त्यांचं कुटुंब गमावले. या दरम्यान, आधीच इतर आजारांचा सामना करणारे लोकं आणि गर्भवती महिला यांना धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान एका कोरोना ग्रस्त महिलेने निरोगी मुलाला जन्म दिल्याचंही समोर आलेलं. यानंतर आता अजून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कोरोनाने ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलेने कोमामध्येच मुलाला जन्म दिला.
गर्भधारणेदरम्यान महिला कोमात गेली
लस न घेतलेल्या महिलेला गर्भधारणेदरम्यान कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तिची प्रकृती इतकी बिघडली की ती कोमात गेली. पण जेव्हा ती शुद्धीवर आली आणि डॉक्टरांनी सांगितलं की, तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकून त्या महिलेच्या आनंदाला परावार उरला नाही.
द सन मधील एका अहवालानुसार, यूकेमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय केल्सी राऊट्स 28 आठवड्यांची गर्भवती होती. त्यावेळी तिला श्वसनाचा त्रास झाला आणि तिला रुग्णालयात आणण्यात आलं. तपासानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. डॉक्टरांनी महिलेवर उपचार सुरू केले. महिलेला विश्रांती मिळावी म्हणून त्याने तिला इंड्यूज्ड कोमामध्ये पाठवलं.
डॉक्टरांनी असे वाचवले महिला आणि बाळाचे प्राण
डॉक्टरांनी आपत्कालीन सिझेरियन केलं आणि तिची प्रसूती केली. यावेळी केल्सी बेशुद्ध होती. केल्सीच्या डिलीव्हरी डेटच्या 12 आठवड्यांपूर्वी तिचं सिझेरियन करण्यात आलं. बाळाच्या जन्मानंतर 7 दिवसांनी ती कोमातून बाहेर आली. तिच्या बाळाला पाहून ती फार खूश होती. ती म्हणाला, 'हे सर्व अद्भुत होते.'
ती पुढे म्हणाली की, मला माहित आहे की डॉक्टरांनी मला आणि माझ्या बाळाला वाचवण्यासाठी हे केलं, पण मला धक्का बसला. जे काही घडलं त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत.