48 thousand children infected with Covid : पहिल्या आणि दुस-या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी होतं. पण BF.7 या कोरोना व्हेरिएंटमुळे लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडतायत. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाशी संबंधित लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करु नका.


तुमच्या लहान मुलांना जपा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 ते 25 डिसेंबर या कालावधीत अमेरिकेत 48 हजारपेक्षा जास्त मुलांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाची सुरुवात झाल्यापासून जगभरात दीड कोटी लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली. यातील 1 लाख 65 हजार केसेस या गेल्या चार आठवड्यातील आहेत. BF.7 व्हेरिएंटमुळे लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलंय.  


कोरोनाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत 10 कोटी रुग्णांची नोंद झाली आहे. 10 कोटी रुग्णसंख्या पार करणारा अमेरिका हा जगातला पहिला देश ठरलाय. त्यातही फक्त आठवड्याभरात तब्बल 48 हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. 



भारतात जरी कोरोनाचा कहर दिसत नसला तरी आपल्या लहानग्यांची काळजी घ्या, तुमच्या चिमुरड्यांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली तर तात्काळ डॉक्टरांकडे जा.. कारण BF.7 व्हेरिएंट आधीच्या सगळ्या व्हेरिएंटपेक्षा अधिक घातक आहे.


भारतावर चौथ्या लाटेचा धोका?


भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा (Corona Fourth Wave) धोका वाढला आहे. पुढच्या 40 दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे 40 दिवस खूप महत्वाचे आहेत. जानेवारीत कोरोनाची प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. कोरोनाची चौथी लाट आली तरी मृतांची संख्या वाढणार नाही, किंवा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.


पुढचे 40 दिवस महत्वाचे


पूर्व आशियामध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी भारतात कोरोनाची नवीन लाट येते, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे. आता कोरोनाच्या नव्या लाटेने पूर्व आशियाई देशांमध्ये (East Asian Countries) जोर पकडला आहे. चीनपासून, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान या देशांत नवीन कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. या आधारावर, जानेवारीच्या अखेरीस भारतात नवीन रुग्णणांमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


भारतात BF.7 सब व्हेरिएंटचा धोका


भारतात गेल्या आठवड्यात BF.7 व्हेरिएंटचे चार रुग्ण आढळून आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात विदेशातून आलेल्या 6 हजार प्रवाशांमध्ये 39 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. केंद्र सरकारने चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि सिंगापूर या देशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे.