एम्सच्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा; मृतांमध्ये लस न घेणाऱ्यांचा समावेश
कोरोना प्रतिबंधक लस ही केवळ हा व्हायरस गंभीर होण्यापासून वाचवत नाही तर मृत्यूचा धोकाही कमी करते
मुंबई : देशावरून अजून कोरोनाचं संकट टळलेलं नाही. दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका व्यक्त करण्यात येतोय. अशातच देशात लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येतोय. कोरोना प्रतिबंधक लस ही केवळ हा व्हायरस गंभीर होण्यापासून वाचवत नाही तर मृत्यूचा धोकाही कमी करते. नुकतंच एम्सच्या झालेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.
एम्स झज्जरमध्ये दाखल रुग्णांच्या अहवालात 294 (76%) लसीकरण न झालेल्या लोकांचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय. तर दुसरीकडे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये फक्त 1 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच केवळ 0.03% मरण पावले. यानुसार असं लक्षात येतंय की, लसीकरण हे या विषाणूविरूद्ध सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी.
एम्सच्या अहवालानुसार, लसीकरणासाठी 1818 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी 1314 रुग्णांनी म्हणजेच 72.3% रुग्णांनी लस घेतली नाही. एम्स झज्जरमध्ये उपचारांसाठी आलेले मात्र लस न घेतलेल्या 294 जणांचा मृत्यू झाला. म्हणजे 76.4% व्यक्ती मरण पावले. तर 215 दाखल रुग्ण होते, ज्यांना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा कमी काळात त्यांना कोरोनाची लागण झाली. असे एकूण 11.8% रुग्ण होते. यापैकी 42 मरण पावले.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी 258 रुग्णांना दाखल करण्यात आलं, म्हणजेच एक डोस घेतल्यानंतर संक्रमित रुग्णांची संख्या 14.2% होती. यापैकी 48 (12.5%) जणांच्या मृत्यूची नोंद आहे. त्याच वेळी, 31 लोकांना ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते त्यांना संसर्ग झाल्यामुळे दाखल करण्यात आले. यामध्ये केवळ 0.03% मृत्यू असल्याची माहिती आहे.
अभ्यासात सहभागी असलेल्या एका डॉक्टरांनी सांगितलं की, या अभ्यासामुळे लसीकरण किती प्रभावी आहे हे स्पष्ट होतंय. यामध्ये 76% लोकांचा लसीशिवाय मृत्यू झाला, तर फक्त 0.3% दोन्ही डोस घेतल्यानंतर मृत्यू झाला. म्हणूनच, लस हा या विषाणूविरूद्ध एक उत्तम संरक्षण आहे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे