सावधान! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; राज्य सरकारने जारी केल्या या महत्वाच्या सूचना
जगात कोरोनाचा उद्रेक कमी झालाय परंतू चीन व इतर काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसतो आहे
मुंबई : जगात कोरोनाचा उद्रेक कमी झालाय परंतू चीन व इतर काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसतो आहे. भारतातही काही भागात कोरोनाने तोंड वर केल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोना रूग्णसंख्येत वाढ दिसून आल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन केल आहे. मास्कचा वापर सरकारने अजूनही ऐच्छिक ठेवला असला तरीही गेल्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांना मास्क वापरा अशा सूचना राज्य सरकारद्वारे करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाचेही आवाहन
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना रूग्णांची आकडेवारील वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता धोका टाळण्यासाठी प्रवासात मास्क वापरावा असे आवाहन रेल्वे प्रशासनानेही केले आहे.
रजेवरील कैद्यांना नोटीस
संपूर्ण राज्यात जवळपास 12 हजार कैदी कोरोनाच्या रजेवर आहेत. कोविड निर्बंधांना 1 महिना उलटून गेल्यानंतर राज्यसरकारने रजेवर असलेल्या सर्व कैद्यांना हजर होण्याची नोटीस पाठवली. नोटीस मिळाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत सर्व कैद्यांना वेळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता ते पुन्हा कारागृहात परतणार की नाही? याविषयी अनेक तर्क वितर्क केले जात आहेत.
ऑपरेशन मालेगाव मॅजिकला यश
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्यात अनेक ठिकाणी सर्वे करणयात आले होते. ऑपरेशन मालेगाव मॅजिक द्वारे केलेल्या सर्व्हेमध्ये मालेगाव अव्वलस्थानी आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मालेगावमध्ये कोरोनाचा कहर झाल्यानंतरही मालेगावच्या नागरिकांमध्ये 96 टक्के दांडगी रोग प्रतिकार शक्ती असल्याचं या सर्वेमधून समोर आलं आहे. आजपासून पुन्हा एकदा दुसरा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.