मुंबई : कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंट डेल्टा प्लसने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. पण डेल्टा प्लस हा एकच असा व्हेरिएंट नाही जो धोकादायक आहे. यासोबत कोरोनाचे 6 व्हेरिएंट आहेत जे खूपच धोकादायक असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरसचं म्यूटेशन होतं आणि ते विकसित होतात. यामुळे एक नवीन व्हेरिएंट तयार होतो. जागतिक आरोग्य संस्थाच्या मते, जेव्हा एखादा व्हायरसची प्रतिकृती तयार होते तेव्हा तो स्वतःच त्याची प्रतिकृती बनवू लागतो. व्हायरसमध्ये होणार्‍या याच बदलास म्युटेशन असं म्हणतात. कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली असून डेल्टा प्लस हा व्हेरिएंट खूपच संक्रामक असल्याचं आढळून आलंय.


डेल्टा प्लस व्हेरिएंटशिवाय, कोरोनाचे इतरही अनेक व्हेरिएंट आहेत की जे मूळ स्ट्रेनपेक्षा अधिक धोकादायक आहेत. तज्ज्ञांनी डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटव्यतिरिक्त कोरोनाचे अनेक नवे व्हेरिएंट शोधले आहेत जे पुढील काळात अधिक धोकादायक ठरु शकतात.


दि लम्बडा व्हेरिएंट 


कोरोनाचा लम्बडा व्हेरिएंट पहिल्यांदा ऑगस्ट 2020 मध्ये पेरू देशात सापडला होता. हा व्हेरिएंट आतापर्यंत सुमारे 29 देशांमध्ये पसरला असल्याची माहिती आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या मताप्रमाणे, 23 फेब्रुवारी ते 7 जून या कालावधीत लम्बडा व्हेरिएंटचे सहा रुग्ण यूकेमध्ये सापडले आहेत. PHEने लम्बडा व्हेरियंटला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून लिस्टेड करण्यात आलं आहे.


कप्पा व्हेरिएंट 


SARS-COV-2 व्हायरसचा कप्पा व्हेरिएंट हा पँगो वंशाच्या B.1.617च्या तीन उप-वंशांपैकी एक आहे. काही अहवालांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, हा व्हेरिएंट प्रथम 2020 डिसेंबरमध्ये भारतात आढळला होता. हे E484Q आणि E484K चे डबल म्यूटेशन व्हेरिएंट आहे. हे L452R म्यूटेशनमुळे होतं. ज्याच्या मदतीने व्हायरस रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.


B.11.318


कोरोनाच्या B.11.318 व्हेरिएंटमध्ये कप्पा व्हेरियंट प्रमाणेच E484Kचं म्युटेशन होतं. भारताने या नवीन व्हेरिएंटचे दोन जीनोम सिक्वेन्सही नोंदवले आहेत. 


B.1.617.3


B.1.617 पासून जन्मलेला B.1.617.3 व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंट B.1.617.2 चा एक भाग आहे. तज्ज्ञांनी आता B.1.617.3 ला 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' म्हणून लिस्टेड केलं आहे.


दक्षिण आफ्रिकेतील B.1.351 व्हेरिएंट


दक्षिण आफ्रिकेमध्ये धुमाकूळ घालणारा B.1.351 व्हेरिएंट हा ऑगस्ट 2020 मध्ये सापडला होता. हा व्हेरिएंट आतापर्यंत 75 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. डेल्टा व्हेरिएंट प्रमाणेच हा व्हेरिएंटही खूप वेगाने पसरत असल्याची माहिती आहे. हा व्हेरिएंट एखाद्या व्यक्तीस गंभीररित्या संक्रमित करु शकतो. 


जपान - ब्राझील B.1.1.28.1 व्हेरिएंट


डिसेंबर 2020 मध्ये सापडलेला कोरोनाचा हा व्हेरिएंट देखील अत्यंत संसर्गजन्य आहे. शास्त्रज्ञ अद्याप या व्हेरिएंटची गंभीरता किती आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतायत.