Giloy Side Effects: गिलोयमुळे लिव्हरचं नुकसान होतंय? आयुष मंत्रालय म्हणालं...
सोशल मीडियावर गिलोय ज्युसमुळे लीव्हर म्हणजेच यकृतावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा करण्यात येत होता.
मुंबई : नुकतंच काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर गिलोय ज्युसमुळे लीव्हर म्हणजेच यकृतावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा करण्यात येत होता. यानंतर लोकांच्या मनात गिलोय ज्युससंदर्भात संभ्रम निर्माण झाले. मात्र यावर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आयुष मंत्रालयाच्या सांगण्यानुसार, गिलोयमुळे लीव्हरचं नुकसान होण्याचा दावा ही केवळ एक अफवा आहे.
जर्नल ऑफ क्लिनिकल एंड एक्सपेरिमेंटल हेपेटोलॉजीमध्ये यासंदर्भातील अहवाल छापण्यात आला होता. ज्यामध्ये गिलोयमुळे यकृताचं नुकसान होत असल्याचं म्हटलं होतं.
गिलोयवर करण्यात आलेल्या या अभ्यासात नमूद करण्यात आलं होतं ती, गिलोयच्या सेवनाने मुंबईमध्ये 6 लोकांचं लिव्हर फेल झालं आहे. तर आयुष मंत्रालयाने सांगितलं की, या स्टडीसंदर्भात जोडल्या गेलेल्या व्यक्ती यासंदर्भातील योग्य माहिती देण्यासाठी अयशस्वी ठरले आहेत.
आयुष मंत्रालयाने सांगितल्यानुसार, गिलोय यकृताच्या नुकसानाशी जोडल्यास भारताच्या पारंपारिक औषध प्रणालीविषयी संभ्रम निर्माण होईल. गिलोयचा अनेक काळापासून आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून वापरला जात आहे. गिलोय अनेक शारीरिक आजारांमध्ये खूप प्रभावी ठरला आहे.
आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या संशोधनात अनेक त्रुटी आहेत. तसंच यामध्ये रुग्णांना किती डोस देण्यात आला हे देखील सांगण्यात आलं नाही. किंवा रूग्णांनी या औषधी वनस्पती इतर कोणत्या औषधासोबत वापरल्या नाहीत ना?. या व्यतिरिक्त, रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासाविषयी अभ्यासात काहीही सांगण्यात आलेलं नाही. अशाप्रकारे, कोणतेही ठाम पुरावे न ठेवता संशोधन प्रकाशित केल्यामुळे अफवा उघडतील आणि आयुर्वेदाच्या जुन्या परंपराची बदनामी होईल.
गिलोयचा आयुर्वेदात औषध म्हणून दीर्घकाळापासून वापर केला जातोय. आयुर्वेद तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यात यकृतच्या फायद्यासाठीचे अनेक घटक असतात. आतापर्यंत त्याचे दुष्परिणाम कोणत्याही अभ्यासात किंवा क्लिनिकल चाचणीमध्ये पाहिले गेले नाहीत.
गेल्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान मुंबईतील डॉक्टरांनी गिलोयमुळे यकृत खराब होण्याची सहा प्रकरणं पाहिली होती. यापैकी बहुतेक रूग्णांमध्ये कावीळची समस्या दिसून आली होती.