रेबीजच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
रेबीजची 95-96% प्रकरणं रेबीज बाधित कुत्र्याच्या चाव्यामुळे होतात. लक्षणं दिसून येताच रेबीज जीवघेणा ठरतो.
नवी दिल्ली : रेबीज हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. रेबीज विषाणूने संक्रमित कुत्रे, मांजरी, माकडे, मुंगूस आणि सियार तसंच इतर काही प्राण्यांच्या चाव्याद्वारे रेबीज रोग पसरतो. रेबीजची 95-96% प्रकरणं रेबीज बाधित कुत्र्याच्या चाव्यामुळे होतात. लक्षणं दिसून येताच रेबीज जीवघेणा ठरतो. परंतु रेबीजच्या विषाणूला पूर्णपणे टाळता येतो.
केंद्र सरकार देखील या विषाणूच्या प्रतिबंधाबाबत अत्यंत गंभीर आहे. आणि याचसाठी 2030 पर्यंत कुत्र्यांपासून पसरणाऱ्या रेबीजचं उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. ज्या अंतर्गत 'नॅशनल अॅक्शन प्लॅन फॉर डॉग-मीडिएटेड रेबीज एलिमिनेशन 2030' लाँच करण्यात आलं आहे. ज्यामध्ये केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय देखील योगदान देईल.
जागतिक रेबीज दिनानिमित्त, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशाला रेबीजमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. ज्यासाठी 'नॅशनल एक्शन प्लान फॉर डॉग मीडिएटेड रेबीज एलिमिनेशन' या कार्यक्रमाचं अनावरण करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत जनजागृती मोहीम, रुग्णालयांमध्ये लसीकरणाची उपलब्धता तसंच भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले जाईल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनाही भारताला सहकार्य करणार आहे.
जगात रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 33 टक्के मृत्यू भारतात
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितलं की, जगातील रेबिजमुळे होणारे 33% मृत्यू हे भारतात होतात. 2030 पर्यंत कुत्र्यापासून होणाऱ्या रेबीज निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत सर्व राज्य सरकारांसोबत काम करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
रेबीजमुळे दरवर्षी 20000 लोकांचा मृत्यू
रेबीज हा प्राणघातक विषाणूजन्य जूनोटिक रोग आहे. जो वेळेवर लसीकरणाने पूर्णपणे टाळता येतो. दरवर्षी सुमारे 20,000 लोक रेबीज विषाणूमुळे मरतात. यातील, 95% पेक्षा जास्त मृत्यू रेबीज विषाणूने संक्रमित कुत्र्यांच्या चाव्यामुळे होतात.