मुंबई : भारतात सर्वाधिक प्यायले जाणारे पेय म्हणून चहाचा पहिला क्रमांक लागतो. चहा, कॉफी म्हटलं की अनेक जण दूधाच्या चहा, कॉफीला पसंती देतात. दूधाच्या चहाच्या तुलनेत खूप कमी लोकांना ब्लॅक टी आवडते. तुलनेने ब्लॅक टी चवीला चांगली लागत नसली तरी त्याचे अनेक फायदे आहेत. बाजारात अनेक प्रकारच्या ब्लॅक टी उपलब्ध आहेत. घरात बनवली जाणरी ब्लॅक टी लिंबू रस टाकून घेता येते. बाजारात इंग्लिश ब्रेकफास्ट टी, अर्ल ग्रे टी, आसाम टी, दार्जिलिंग टी, निलगिरी टी असे चहाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीत एक संशोधन करण्यात आले होते. या संशोधनाचा अहवाल यूरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये पब्लिश करण्यात आला होता. या अभ्यासानुसार ब्लॅक टीमध्ये विविध प्रकारचे विशेष तत्व असल्याचे सिद्ध झाले आहे. ब्लॅक टीमधील चहाचे विशेष तत्व पोटात जाऊन मोठा प्रभाव पाडतात. ब्लॅक टीमुळे वजन घटवण्यास मदत होते. तसंच शरीरातील टॉक्सिंस, विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर निघाल्यामुळे कोणताही आजार बळावण्याची शक्यता कमी होते. टॉक्सिंस शरीरातून बाहेर पडल्यामुळे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते.


चहात अॅन्टी ऑक्सिडेंट सर्वाधिक असतात. अनेक संशोधनांतून संशोधकांनी ब्लॅक टी आणि ग्रीन टीमध्ये प्रोबायोटिक्स तत्व आढळून येत असल्याचे सांगितले आहे. प्रोबायोटिक्स तत्व शरीरात प्रतिरोधक सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी मदत करतात. ब्लॅक टी वजन नियंत्रणात ठेऊन अनेक आजारांपासून बचावही करते. 


ब्लॅक टीमध्ये दूध आणि साखर नसल्याने शरीरात फॅट जमा होत नाही. चहातील अॅन्टीऑक्सीडेंट शरीरातील अतिरिक्त चरबी न वाढू देण्याचे काम करते. एका संशोधनातून दिवसांतून तीन वेळा ब्लॅक टी पिण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहत असल्याचे समोर आले आहे. डोकेदुखी होत असल्यास ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून प्यायल्याने डोकेदुखीत आराम मिळतो.