हिरड्यांमधून रक्त येतंय? या घरगुती उपायांमुळे मिळेल त्रासापासून सुटका
काहीवेळा हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या जास्त घासल्यामुळे किंवा दातांच्या अयोग्य फिटिंगमुळे होऊ शकते.
मुंबई : अनेकांना हिरड्यांतून रक्तस्राव होण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. काहीवेळा हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या जास्त घासल्यामुळे किंवा दातांच्या अयोग्य फिटिंगमुळे होऊ शकते. परंतु हिरड्यांमधून वारंवार रक्तस्त्राव होणं व्हिटॅमिनची कमतरता, प्लेटलेटची कमतरता, हिरड्यांचे रोग पीरियडॉन्टायटीस, स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल याचे संकेत असतात.
हिरड्यांमध्ये वारंवार रक्तस्त्राव होणं धोकादायक नाही, परंतु त्यावर उपचार करणं आवश्यक आहे. हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येवर घरगुती उपायांनीही आराम मिळू शकतो. यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा अवलंब करावा लागेल.
नारळाचं तेल
नारळाच्या तेलामध्ये एंटी-इफ्लांमेंटरी गुणधर्म असतात ज्यामुळे हिरड्यांवरील सूज आणि रक्तस्त्राव दूर होतो. या तेलात असलेले अँटी-मायक्रोबियल गुणधर्म दात स्वच्छ ठेवतात. ते वापरण्यासाठी, 10 ते 15 मिनिटे तोंडात खोबरेल तेल फिरवत ठेवा.
लवंगाचं तेल
लवंगाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म अत्यंत फायदेशीर ठरतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही लवंगाचं तेल थेट हिरड्यांना लावू शकता. कोमट लवंगाचे तेल दिवसातून दोनदा हिरड्यांवर लावा. हिरड्यांवर 5-10 मिनिटं राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
मीठाचं पाणी
मिठात एंटी-इफ्लांमेंटरी आणि जंतुनाशक गुणधर्म असतात जे हिरड्यांमधील जळजळ आणि संसर्ग कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. कोमट पाण्यात काही प्रमाणात मीठ मिसळा आणि स्वच्छ धुवा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हे दिवसातून 2-3 वेळा करू शकता.