दिल्ली : सध्या कोरोना प्रतिबंधक लस कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध महत्वाचं शस्त्र मानलं जातं. गुरुवारी लसीकरणाबाबतीत 100 कोटींचा आकडा पार करून नवीन विक्रम गाठला आहे. अशा परिस्थितीत आता बूस्टर डोसबाबत चर्चा जोरात आहे. भारतातील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात यावा की यावर कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ व्ही के पॉल यांनी विधान केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. व्ही.के पॉल म्हणाले की, भारताचे लक्ष देशातील प्रौढ लोकसंख्येच्या संपूर्ण लसीकरणावर आहे. सध्या आमच्याकडे बूस्टर डोसच्या परिणामाशी संबंधित कोणताही पुरेसा डेटा नाही. म्हणून भारत सध्या कोणत्याही बूस्टर डोसचा विचार करत नाही.


एका वेबसाईटशी बोलताना व्ही. के पॉल यांनी सांगितलं की, "कोविड लसींच्या बूस्टर डोसची शिफारस करण्याच्या गरजेवर भारताने अद्याप विचार केला नाहीये. कारण तो अजूनही संशोधनाचा विषय आहे. अनेक देश सध्या बूस्टर डोस देत नाहीत. बूस्टर डोसबाबत अद्याप कोणतीही जागतिक शिफारस देखील करण्यात आलेली नाही."


डॉ पॉल म्हणाले, "बूस्टर डोसच्या प्रकरणाकडे अनेक प्रकारे पाहिलं पाहिजे. सर्वप्रथम आपल्याला हे पाहावं लागेल की लस घेतल्यानंतर, कोणत्याही व्यक्तीमध्ये रोग प्रतिकारशक्ती कधी आणि किती कमी होते आणि नंतर जर त्याला बूस्टर डोस दिला गेला तर त्याला किती मदत मिळते. अगदी जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही यूनिवर्सल बूस्टर डोसची शिफारस करत नाही."


भारत सरकार आणि तांत्रिक टीम यावर बारीक लक्ष ठेवून आहे. दरम्यान बूस्टरच्या आधी, आम्ही सर्व लोकांना लसीकरण करण्यावर भर देत आहोत. देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस द्यावी हा आमचा प्रयत्न आहे, असंही डॉ. पॉल म्हणाले.