बिहार : काही दिवसांपूर्वी बिहारच्या एक व्यक्तीने आपण लसीचे 11 डोस घेतले असल्याचा दावा केला होता. यानंतर या जेष्ठ व्यक्तीविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आली. मात्र आता चौकशी केल्यानंतर या व्यक्तीने लसीचे 11 डोस घेतले नसल्याचं स्षष्ट झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील ब्रह्मदेव मंडल या व्यक्तीने दावा केला की त्यांनी लसीचे 11 डोस घेतले होते. मात्र राज्याने केलेल्या तपासणीत असं आढळलं की, या व्यक्तीला त्याच्या मूळ जिल्ह्यात कोविशील्डचे केवळ आठ डोस मिळालेत.


यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या तपासणीमुळे सरकारच्या CoWin पोर्टलमधील त्रुटी समोर आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, 84 वर्षीय ब्रह्मदेव मंडल यांना लसीचे आठ डोस देण्यात आले आहेत. लसीकरण प्रमाणपत्रानुसार, 13 मार्च ते 7 नोव्हेंबर 2021 दरम्यान त्यांचं लसीकरण करण्यात आलं. एका प्रमाणपत्राप्रमाणे त्यांनी 13 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवशी लसीचे दोन डोस घेतल आहेत.


मंडल यांना गेल्या वर्षी 21 जून ते 24 जुलै दरम्यान 33 दिवसांच्या अंतराने दोनदा लस दिली असल्याचं प्रमाणपत्र आहे. 12 मे रोजी, केंद्र सरकारने कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 84 दिवस केलं होतं. मात्र यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की, कोविन पोर्टलने मे नंतर दिलेल्या दोन डोसमध्ये 84 दिवसांचे अंतर कसं राखलं नाही.


मधेपुरा जिल्ह्यातील 84 वर्षीय ब्रह्मदेव मंडल यांनी दावा केला होता वेगवेगळ्या ठिकाणी 11 वेळा कोरोनाची लस घेतली होती. दरम्यान याचा खूप फायदा झाल्याचंही या व्यक्तीने सांगितलं होतं. लस घेतल्यानंतर त्याच्या गुडघ्याचा त्रास कमी झाला. यामुळे त्याने लसीचे इतके जास्त डोस घेतले होते.


मात्र हे लसीचे 11 डोस घेणं त्यांना महागात पडलं. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारीनंतर या व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.