मुंबई : जगाप्रमाणेच भारतातील महिलांसाठी ब्रेस्ट हा सर्वात धोकादायक कॅन्सर असल्याचं मानलं जातं. दरवर्षी देशभरात 75,000 हून अधिक महिलांचा या कॅन्सरमुळे बळी जात असल्याची नोंद आहे. दरम्यान NFHS-5 सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, देशातील महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या चाचणीचं प्रमाण गर्भाशय आणि तोंडाच्या कॅन्सरपेक्षा कमी असल्याची नोंद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या NFHS-5 च्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात पहिल्यांदाच कॅन्सरच्या टेस्टिंगचा समावेश करण्यात आला आहे. ज्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका महिलांना दिसून येतो, त्याचसंदर्भात कमीत कमी चाचण्या केल्या जात असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. 


कॅन्सरच्या टेस्टिंगची टक्केवारी 


गर्भाशयाचा कॅन्सर- 1.2


स्तनाचा कॅन्सर- 0.6


तोंडाचा कॅन्सर- 0.7


मुंबईतील सिनियर कंसल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संजय दुधाट यांनी झी 24 तासला टेस्टिंग कमी असण्यामागे काय संभाव्य कारणं असू शकतात यांची माहिती दिली. डॉ. दुधाट यांच्या सांगण्यानुसार, "मुळात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरबाबत जनजागृती फारच कमी आहे. याचं प्रमाण वाढलं पाहिजे. सध्या तरूण मुलीही या आजाराच्या विळख्यात सापडत असून त्यांनी सेल्फ ब्रेस्ट एक्सामिनेशन म्हणजेच स्तनांची स्वःपरिक्षेवर भर दिला पाहिजे." 


"इतकंच नाही तर कॅन्सरचं निदान होण्यासाठी केल्या जाणाऱ्या मेमोग्राफीबाबतही महिलांना फारशी माहिती नसते. दुसरीकडे ही मेमोग्राफी करण्यासाठी कुठे जावं, याचा रिपोर्ट नेमका कोणत्या डॉक्टरकडे दाखवावा याबाबतही महिलांमध्ये फारशी जागृती दिसून येत नसल्याचं" डॉ. दुधाट म्हणालेत.


गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत, जिथे 1000 पैकी 12 महिलांची तपासणी केली जाते, तिथे स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीत (1000 पैकी 6) हा दर अर्धा आहे.


डॉ. दुधाट अजून काही मुद्द्यांविषयी माहिती देताना म्हणाले, "टेस्टिंग कमी असण्यामागे अजून एक कारण असू शकतं ते म्हणजे, अनेक महिला माहिती असून किंवा त्रास होत असूनही मेमोग्राफीसारखी टेस्ट करत नाही. टेस्टमध्ये अनेक गोष्टी समोर येतील या भीतीने त्या टेस्ट करणं टाळतात."


"ब्रेस्ट कॅन्सरसारखा आजार कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला असेल तर पुढच्या पिढीत तो होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आनुवांशिकरित्या हा आजार होऊ शकतो, हे माहिती असून त्या कुटुंबातील इतर महिला जणी टेस्टिंग करण्यास टाळाटाळ करतात. शिवाय यामागे अजून एक कारण असू शकतं ते म्हणजे, टेस्टिंगच्या किमती. प्रत्येकालाच टेस्टिंगच्या किमती परवडतील असं नाही, त्यामुळे या कारणानेही काही महिला टेस्ट करण्यास नकार देत असल्याची शक्यता, डॉक्टरांनी वर्तवलीये.


दरम्यान नॅशनल कॅन्सर रेजिस्ट्री प्रोग्रामच्या अहवालात असा अंदाज आहे की, 2025 सालापर्यंत भारतात कर्करोगग्रस्तांची एकूण संख्या 1.5 दशलक्ष पार करेल.