Breast Self-Exam: कॅन्सर रोखण्यासाठी घरच्या घरी स्तनांची कशी तपासणी कराल? पाहा संपूर्ण प्रक्रिया
Self-Breast Exam: मुंबईच्या एका रूग्णालयातील कन्सल्टन्ट मेडिकल ऑन्कोलॉस्ट डॉ. उमा डांगी म्हणाल्या की, स्वत:च्या स्तनांची तपासणी करणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्त्रियांना आपल्या स्तनांची ओळख होते.
Self-Breast Exam: ग्लोबोकॉन 2020 मध्ये झालेल्या सर्व्हेक्षणानुसार, भारतामध्ये दर चार मिनिटांमध्ये एका महिलेस ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनांच्या कर्करोगाचे असल्याचं निदान होतं. याहूनही काळजीची आणखी एक बाब म्हणजे पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये तरुण वयातील महिलांना या कर्करोगाचे निदान होत आहे. यापैकी ३० टक्के महिला उशीरा निदान झाल्याने आणि आजार गंभीर टप्प्यावर पोहोचल्याने कॅन्सरला बळी पडतात. मुळात लवकरात लवकर निदान झाल्यास हे सहज टाळता येण्यासारखे आहे. कर्करोग बरा करण्यास महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे नियमित चाचणी.
मुंबईच्या एका रूग्णालयातील कन्सल्टन्ट मेडिकल ऑन्कोलॉस्ट डॉ. उमा डांगी म्हणाल्या की, स्वत:च्या स्तनांची तपासणी करणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्त्रियांना आपल्या स्तनांची ओळख होते. हे नियमितपणे केल्यास स्तनांत एखादी गाठ दिसणं, त्यांचा आकार, बाह्यरेखा बदलणे, स्तनाग्रांतून काही द्रव बाहेर येणे अशा काही अस्वाभाविक गोष्टी त्यांच्या चटकन लक्षात येऊ शकतात. ही ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. ती लवकर लक्षात आल्यास स्त्रिया डॉक्टरांकडे जाऊ शकतात आणि आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच उपचार करून घेऊ शकतात.
एखाद्या स्त्रीने स्तनांची स्वयं-तपासणी कशी करावी?
स्तनांच्या स्वयं-तपासणीचे दोन भाग आहेत, ज्यात दृश्य आणि शारीरिक तपासणीचा समावेश होतो. दृश्य तपासणी करण्यासाठी पुढील गोष्टी टप्प्याटप्याने करा.
महिलांनी निर्वस्त्र आरशासमोर उभे रहा आणि आपले हात बाजूला ठेवा.
आपल्या स्तनांचा लहान-मोठेपणा, आकार किंवा प्रमाणबद्धता यात काही बदल दिसत आहे का, डिम्पलिंग, आत गेलेली स्तनाग्रं, त्वचेचा पोत बदलणे आणि स्तनांच्या खाली उचंसखल भाग तयार होणं असे काही दृश्य बदल दिसत आहेत का याचं निरीक्षण करा.
तुम्ही तीन स्थितीमध्ये राहून ही तपासणी करू शकता - एकदा त्यांच्याकडे पाहत असताना, दुसऱ्यांदा आपले बाहू आपल्या डोक्यावर नेऊन आणि अखेर अजून एक पद्धत म्हणजे स्तन काहीसं वर उचलून पाहत.
शारीरिक तपासणीसाठी पुढील गोष्टी पायरीपायरीने करा:
बोटांच्या टोकांनी नव्हे तर संपूर्ण बोटांचा वापर करून एकदा उभ्याने आणि एकदा झोपलेल्या स्थितीमध्ये आपल्या स्तनांची तपासणी करा.
स्तनाग्रांपासून सुरुवात करत, वेगवेगळ्या प्रमाणात दाब देऊन आपल्या बोटांनी स्तनांना विविध पद्धतीने मसाज करा.
स्तनांच्या हाडास मध्यवर्ती ठेवून तसेच स्तनांची बाजू व काखेचा भाग सामावून घेत कॉलरबोन म्हणजे गळ्याजवळच्या हाडाच्या वरच्या बाजूपर्यंत जा.
अखेर आपल्या स्तनाग्रांना हलकेच दाबा आणि त्यातून काही स्त्राव बाहेर येत नाही ना हे तपासा
स्तनांची तपासणी कधी करावी?
डॉ. उमा डांगी पुढे म्हणाल्या, स्तनांची तपासणी महिन्यातून एकदा व तुमची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर ५-७ दिवसांनी करावी. हार्मोन्समधील बदलांमुळे तुमच्या स्तनांच्या आकार व पोतावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे तुमचे स्तन त्यांच्या सर्वसामान्य स्थितीत असताना त्यांची तपासणी करणे आदर्श ठरेल. गरोदर स्त्रिया किंवा रजोनिवृत्ती प्राप्त झालेल्या स्त्रियांना महिन्यातून एखादा विशिष्ट दिवस ही तपासणी पूर्ण करण्यासाठी राखून ठेवता येईल. वयाच्या अगदी विसाव्या वर्षापासूनच स्तनांची स्वयंतपासणी सुरू करणं फायदेशीर ठरेल.