जॉन्सन बेबी पावडरमध्ये कर्करोगासाठीचे घातक घटक
जॉन्सन अँड जॉन्सन या अग्रगण्य कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कर्करोगासाठी कारण ठरणारे घटक सापडले.
नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सन या अग्रगण्य कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कर्करोगासाठी कारण ठरणारे घटक सापडले. त्यानंतर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजेच सीडीएससीओने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या हिमाचल प्रदेशमधल्या प्रकल्पातून नमुने गोळा केलेत. या संबंधीचं वृत रॉयटर वृत्तसंस्थेनं मागील आठवड्यात दिलं होतं.
जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये घातक अॅस्बेस्टॉसचा समावेश आहे. विशेष म्हणजे कंपनीला कित्येक वर्षांपासून त्याची पूर्ण माहितीही आहे. मात्र याबाबत जाणीवपूर्वक उल्लेख केला जात नाही, असं रॉयटरनं आपल्या बातमीत म्हंटलं होतं. गंभीर बाब म्हणजे १९७१ पासून २००० पर्यंत कंपनीच्या बेबी पावडरमधल्या कच्च्या मालात, तसंच बाजारात पाठवलेल्या बेबी पावडरमध्येही अॅस्बेस्टॉस आढळल्याचा दावा ही रॉयटरनं केला होता.
मात्र कंपनीनं हे सारे आरोप फेटाळून लावले. दरम्यान सी डी एस सी ओ नं कंपनीच्या विविध प्रकल्पांची तसंच मालाची तपासणी करण्यासाठी १०० हून अधिक निरीक्षकांचं पथक नेमलं आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं तपासणी तसंच जप्तीचं वृत्त फेटाळून लावलं आहे.