Local Train : लोकल म्हणजे ट्रेन हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मुंबईकरांच्या कामाची सुरुवात ट्रेनच्या प्रवासाने होते. ट्रेनता प्रवास हा दिवसेंदिवस जीवघेणा होत चालला आहे. ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा मुंबईकर आपली बॅग छातीवर घेऊन प्रवास करतात? गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी प्रवास करताना हा सोपा मार्ग असल्याचं अनेकांना वाटतं. पण तुम्हाला माहित आहे का? बॅग छातीवर घेण्याची सवय गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते. याबाबत आम्ही डॉ. मनिष इतोलिकर, कन्‍सल्‍टण्‍ट फिजिशियन, फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टर मनिष यांनी बॅग छातीवर घेऊन प्रवास करणे शरीरासाठी किती घातक असल्याचं सांगितलं आहे.? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबईसारख्‍या मेट्रो शहरांमध्‍ये लोकल ट्रेन आणि बसमध्‍ये उभ्याने प्रवास करणे हे अनेकांसाठी नित्याचे आहे. गर्दीच्या वेळी, या गाड्यांमध्ये खूप गर्दी असते. परिणामत: व्‍यक्‍तींना बसण्‍यासाठी जागा क्‍वचितच मिळते. ज्‍यामुळे त्‍यांना दीर्घकाळ उभे राहावे लागते. या प्रवासाचा मुंबईकरांच्या आरोग्‍यावर परिणाम होऊ शकतो. तसेच त्‍यांच्‍यासोबत जड बॅकपॅक देखील असते, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या त्रासामध्‍ये अधिक भर होते. या बॅकपॅकना सपोर्टसाठी व बॅलन्‍ससाठी हातांचा वापर करावा लागतो. 


तसेच ट्रेनमध्ये गर्दीत चढताना अनेक जण बॅग पुढे म्हणजे छातीवर घेऊन प्रवास करतात? जड बॅग घेऊन असा प्रवास दीड ते दोन तास करणे हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून घातक आहे. शरीराच्या कोणकोणत्या भागांवर याचा परिणाम होतो, हे जाणून घेऊया. 


छातीवर होतो परिणाम


जड बॅकपॅक घेऊन उभे राहिल्‍याने शरीराच्‍या स्थितीवर, तसेच मानेवर व पाठीवर परिणाम होतो. यामुळे पाठदुखी व स्‍नायूदुखी होऊ शकते, ज्‍यामुळे त्‍यांना प्रवासादरम्‍यान उभे असताना अधिक त्रास होऊ शकतो. तसेच छातीवर जड बॅग घेतल्याने त्याचा जोर थेट स्तनांवर, छातीवर पडतो. यामुळे महिलांना अनेकदा स्तन दुखण्याचा त्रास होऊ शकतो. तसेच पुरुषांना देखील छातीत दुखण्याचा त्रास होतो. 


व्‍हेरिकोस व्हेन्स


जड वजन घेऊन उभे राहिल्यामुळे पायांमध्ये क्रॉनिक वेनस इन्सुफिशियन्सी किंवा सीव्हीआय सोबत वेदना आणि पेटके देखील येऊ शकतात. ज्यामुळे व्‍हेरिकोस व्हेन्स होऊ शकतात. परिणामी, त्या व्यक्तीला मानदुखी व पाठीतील स्नायूंना त्रास आणि वेदना होऊ शकतात. दीर्घकाळात उभे राहिल्‍यास अधिक त्रास होऊ शकतो. 


व्हर्टिगो


जड बॅकपॅकसह दीर्घकाळापर्यंत उभे राहिल्याने चक्कर येणे आणि व्‍हर्टिगो (अचानक अंतर्गत किंवा बाह्य चक्‍कर येण्‍याच्‍या संवेदना) हा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे थकवा येऊ शकतो. सतत असे होत राहिल्‍यास मान आणि हातांमध्ये न्यूरोलॉजिकल वेदना होऊ शकतात. यामुळे चुकीची मुद्रा, सतत पाठदुखी, सातत्‍याने न्यूरोलॉजिकल वेदना आणि पायांमध्ये वेदना होऊ शकतात. 


स्नायू दुखतात


दुसरीकडे, प्रवास करताना रेलिंगच्या आधारासाठी हात लांब केल्याने ब्रॅचियल प्लेक्ससना (हातांच्या नसा) दुखापत होऊ शकते. त्यामुळे स्नायू कडक होणे आणि हात दुखणे असा त्रास होऊ शकतो. याचा शरीरातील कार्डियोव्‍हॅस्‍कुलर सिस्‍टमवर देखील परिणाम होऊ शकतो, ज्‍यामुळे ऑर्थोस्‍टॅटिक लक्षणे (हलक्‍या स्‍वरूपात डोकेदुखी किंवा चक्‍कर येणे) व अडिमा (सूज येणे) यांसह हार्ट रेट व रक्‍तदाब वाढू शकतो. अडिमा या स्थितीमध्‍ये शरीराच्‍या उतीमध्‍ये द्रवप्रमाण वाढल्‍याने सूज येते.