कुंभकर्णासारखी झोपण्याची सवय ठरू शकते आरोग्यासाठी घातक, हे तोटे एकदा वाचाच!
Oversleeping Side Effect: कुंभकर्णासारखी झोप आहे तुझी, हे वाक्य तुम्ही आई किंवा घरातील सदस्यांकडुन ऐकलं असेलच. तर जाणून घ्या अतिप्रमाणात झोपण्याचे तोटे
Why Oversleeping Is Bad For Your Health: निरोगी आरोग्यासाठी आठ तासांची झोप घेणे आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्यास संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. मानसिक आरोग्यासाठीही चांगली झोप घेणे आवश्यक असते. रात्री झोप नीट झाली नाही तर दिवसभर थकवा राहतो तसंच, कामातही लक्ष लागत नाही. त्यामुळं डॉक्टरही सात ते आठ तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात. झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक असतेच पण तुम्हाला हे माहितीये का जास्त झोप घेतल्याने आरोग्य बिघडूही शकते. अतिप्रमाणात झोपणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. अतिझोपेमुळं शरीराला काय नुकसान होते हे जाणून घेऊया.
झोप किती घ्यावी?
आपल्या वयोमानानुसार झोपेचे गणित बदलत असते. वयानुसार व्यक्तीला किती तास झोपेची गरज आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. 1 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांना 11 ते 14 तासांची झोप आवश्यक असते. 3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी, दररोज 10 ते 13 तासांची झोप पुरेशी मानली जाते, तर 9 ते 12 वर्षांच्या मुलांनी दररोज 9 ते 12 तास झोपले पाहिजे. याशिवाय 13 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन आणि तरुणांनी 24 तासांत 8 ते 10 तास चांगली झोप घेतली पाहिजे
अतिप्रमाणात झोप घेतल्याने होणारे नुकसान
हृदयविकाराचा धोका
जर तुम्ही आठ तासांपेक्षा जास्त वेळ झोपत असाल तर आत्ताच सावध व्हा. कारण जास्त वेळ झोपून राहिल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका वाढतो, त्यामुळं आठ तासानंतरही तुम्हाला झोप आवरत नसेल तर वेळीच ही सवय बदला.
डोकेदुखी
जर तुम्ही पुरेशी झोप घेतली तर त्यामुळे थकवा आणि डोकेदुखी दूर होते, पण जर तुम्हाला जास्त झोपायची सवय असेल तर त्यामुळे डोकेदुखी वाढू शकते, त्यामुळे ही सवय लवकरात लवकर बदला.
डिप्रेशन
झोप घेतल्यामुळं ताण-तणाव कमी होतात. मात्र जास्त झोपल्यामुळंही अशीच समस्या निर्माण होऊ शकते. जे लोक झोप कंट्रोल करु शकत नाहीत ते डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात.
लठ्ठपणा
तुम्ही एका ठराविक वेळेपेक्षा जास्त झोप घेताय का. त्यामुळं तुम्ही व्यायामासाठी पुरेसा वेळ काढू शकत नाहीयेत. त्यामुळं लठ्ठपणा वाढतो. त्यातच पोटाची आणि कंबरेची चरबी वाढू लागते. यामुळं नंतर मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका उद्भवू शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)