Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर, राज्यांना केल्या या सूचना
मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिलं आहे
Monkeypox: जगात मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने राज्यांना मंकीपॉक्सबाबत इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून या प्रकरणात आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
विशेष म्हणजे परदेशातून भारतात येणाऱ्या लोकांवर ठेवलं जात आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये काही लोकांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली होती. दिलासादायक बाब म्हणजे भारतात अद्याप मंकीपॉक्सच्या एकाही प्रकरणाची नोंद झालेली नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा संसर्गजन्य रोग आहे.
केंद्र सरकारने काय दिलेत निर्देश
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार राज्यात बाहेर येणाऱ्या प्रवेश ठिकाणी दक्षता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रोग निरीक्षण पथकापासून ते डॉक्टरांपर्यंत या ठिकाणी तैनात करण्यास सांगण्यात आलं आहे. लक्षणं आढळून आलेल्यांच्या तपासणीसोबतच त्यांच्या संपर्कात असलेल्यांची तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
रुग्णांना विलगिकरणात ठेवण्याबरोबरच त्यांच्या उपचाराची व्यवस्थाही तातडीने करण्यात यावी. त्यांच्यावर वेळोवेळी लक्ष ठेवले पाहिजे आणि ते बरे होईपर्यंत उपचार चालू ठेवावे, जेणेकरून रुग्णांना मृत्यूपासून वाचवता येईल, असे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.
जगभरात मंकीपॉक्सची वाढती प्रकरणं
जगभरात मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून गेल्या आठवड्यात यात 77 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 6,000 पेक्षा जास्त झाली आहे. तर आफ्रिकेच्या काही भागात या विषाणूमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.