नवी दिल्ली : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या चर्चेदरम्यान, केंद्र सरकारने आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर लोकांना विशेष आवाहन केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेताना सांगितलं की, केरळमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी होऊ लागली आहेत. परंतु तरीही ते देशातील एकूण प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.


केरळमध्ये सर्वात जास्त एक्टिव्ह रूग्ण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाच्या मते, 'केरळमध्ये सर्वाधिक 1,44,000 सक्रिय प्रकरणे आहेत, जी देशातील एकूण सक्रिय प्रकरणांच्या 52% आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कोरोनाचे 40,000 सक्रिय रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये 17,000, मिझोराममध्ये 16,800, कर्नाटकमध्ये 12,000 आणि आंध्र प्रदेशमध्ये 11,000 पेक्षा जास्त सक्रिय प्रकरणे आहेत. 


देशभरात सक्रिय प्रकरणं कमी होत आहेत, पण रिकवरी दर सतत वाढतोय. देशात रिकवरी दर सुमारे 98%आहे. देशात असे 18 जिल्हे आहेत, जिथे हा दर आठवड्याला कोरोना विषाणूचा पॉझिटीव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असल्याचं समोर येतंय.


सण ऑनलाईन साजरे करा


लोकांना विनंती करताना आरोग्य सचिवांनी लोकांना गर्दी टाळण्याचं आवाहन केलंय. त्याचसोबत मास्क लावा आणि सणाच्या निमित्ताने सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यास सांगितलं आहे. 


ते म्हणाले की, सणांचा आपण नीट विचार केला पाहिजे. निरोगी राहण्यासाठी सण ऑनलाइन साजरे करावे लागतील. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सल्लागार जारी केला आहे, कंटेनमेंट झोनमध्ये कोणताही गर्दीचा कार्यक्रम आयोजित करू नये असा कठोर इशारा दिला आहे.


बूस्टर डोसची गरज नाही


भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव म्हणाले, “सण जवळ येत आहेत आणि लोक आपापल्या घरी जाण्याचा विचार करत आहेत. जर तुम्ही सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका वाढेल. अशा परिस्थितीत खाजगी वाहनातून तुमचा प्रवास आवश्यक असेल तेव्हाच करा.


बूस्टर डोसबाबत उद्भवलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, 'बूस्टर डोसला सध्या महत्त्व नाही. आता दोन डोस पूर्ण करणं अधिक महत्वाचं आहे. काही राज्यांमध्ये, आम्ही एक अभ्यास केला आहे, ज्यामध्ये असे दिसून आलं आहे की, अँटीबॉडी बऱ्याच काळापासून स्थिर आहे.


69% लोकसंख्येला पहिली लस मिळाली


केंद्र सरकारने गुरुवारी सांगितलं की, देशातील 69% प्रौढ लोकसंख्येला कोविड -19 लसीचा किमान एक डोस मिळाला आहे, तर 25 टक्के लोकांना दोन्ही मिळाले आहेत. कोरोना लसीचे 64.1 टक्के डोस ग्रामीण भागात देण्यात आले, तर 35 टक्के शहरी भागात देण्यात आले.