मुंबई : भारतामध्ये स्त्रिया त्यांच्या आरोग्याबाबत फारशा जागृत नाहीत. त्यामुळेच कॅन्सरसारखे अनेक गंभीर आजार अंतिम टप्प्यावर आल्यानंतर समजतात. अशापैकी एक म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर. एकूण सर्व्हायकल कॅन्सरच्या रूग्णांपैकी एक चतुर्थांश रूग्ण केवळ भारतामध्ये आढळतात. म्हणूनच या आजाराबाबत समाजात जनजागृती आणि स्त्री आरोग्याकडे प्रामुख्याने पाहण्याची गरज वाढली आहे. 


भारतात गोळा केले जातात सॅनिटरी पॅड्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय समाजात अजूनही मासिकपाळी या विषयाबाबत फार खुलेपणाने बोलले जात नाही. परिणामी अनेक तरूण मुली आणि स्त्रियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
ग्रामीण भागात वैद्यकीय सोयींचा अभाव आणि मासिकपाळीदरम्यान कापड वापरण्याची पद्धत असल्याने अशा भागामध्ये स्त्रीया सर्व्हायकल कॅन्सरबाबत चाचणी करायला लाजतात. परिणामी अनेक स्त्रियांना वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे. 


कशी केली जाते चाचणी 


स्त्रिया सर्व्हायकल कॅन्सर संबंधी चाचणी करायला लाजत किंवा टाळत असल्याने आता वैद्यकीय सेवा त्यांच्यापर्यंत पोहचवून या गंभीर आजाराचा धोका ओळखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिता महिलांनी मासिकपाळी दरम्यान वापरलेली कापडं प्लॅस्टिक बॅगेमध्ये बंद करून आरोग्यसेविकांमार्फत डॉक्टरांच्या हवाली केले जातात. त्यानंतर ही कापडं -20 सेल्सियसमध्ये साठवली जातात. पॅड्समधून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) ओळखता येतो. हा व्हायरस सर्व्हायकल कॅन्सरला कारणीभूत ठरतो. ग्रामीण भागात अशाप्रकारे कॅन्सरचा धोका ओळखणं सोयीस्कर आहे. 


सोयी सुविधांचा अभाव 


महिलांमध्ये जननेंद्रिय स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा ग्रामीण भागात नाहीत. परिणामी मासिकपाळीच्या दिवसात त्यांना पुरेसा आराम, स्वच्छ स्वच्छतागृह आणि स्वच्छ पॅड्स/ कापडं न मिळाल्याने त्रास अनेक आजारांना आमंत्रण मिळते.  


काय आहेत सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं 


अनियमित मासिकपाळी ,


सतत होणारी पाठदुखी आणि ओटीपोटीच्या भागाजवळ होणार्‍या वेदना हे सर्व्हायकल कॅन्सरचे सुरवातीच्या टप्प्यातील लक्षण आहे.


मलविसर्जनातून रक्त जाणे. 


थकवा जाणवणे - मासिकपाळी दरम्यान रक्त गेल्याने कमजोर वाटणे किंवा सतत थकवा जाणवणे हे सर्व्हायकल कॅन्सरचे लक्षण आहे. त्यामुळे 'त्या' दिवसां व्यतिरिक्तदेखील तुम्हांला कमजोर वाटत असेल तर सर्व्हायकल कॅन्सरची चाचणी करा.


एकाच पायाला येणारी सूज हे सर्व्हायल कॅन्सरमधील एक महत्त्वाचे लक्षण आहे. त्यामुळे वारंवार आणि अचानक पायावर येणार्‍या सूजेकडे दूर्लक्ष करू नका.


मोनोपॉजच्या टप्प्यानंतरही योनीमार्गातून रक्त जात असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सर्व्हायकल कॅन्सरची शक्यता दूर करा.


 HPV व्हायरसचा संसर्ग झाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी भूकही मंदावते. 
 
 वारंवार आणि अत्यंत वेदनादायी पोटदुखी हे सर्व्हायकल कॅन्सर अंतिम टप्प्यात असल्याचे एक लक्षण आहे.