मुंबई : गेल्या काही काळापासून हवामानात मोठा बदल सर्वांना जाणवतोय. मात्र या बदलाच्या नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्यावरही परिणाम होताना दिसतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या बदलामुळे देशात अॅनिमियाचं प्रमाण वाढणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांच्या सांगण्यानुसार, 2050 पर्यंत भारतातील सुमारे 40 कोटी महिला आणि 10 कोटी मुलांना हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होण्याचा धोका असणार आहे. 


भारतातून कोरोनाचा धोका कमी होताच आपण पुन्हा बेजबाबदारपणे वागू लागलो आहेत. मात्र वातावरणातील बदलामुळे कोरोनापेक्षाही भयंकर आजार समोर येत आहे. आणि ही बाब देशाच्या भविष्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं मत डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केलंय. 


डॉ. रेड्डींनी पुढे सांगितलं की, प्रदूषण, हवामानातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग तसंच ओझोन थर कमी होणं यांसारख्या पर्यावरणातील घटकांचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय. हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याविषयी समस्यांना सामोरं जावं लागतंय. यासाठी प्रत्येकाला भविष्यात हवामान बदलाच्या दुष्परिणामांविषयी सजग होणं गरजेचं आहे. 


मानवाचं आरोग्य हे पर्यावरणाशी जोडलेलं आहे. त्यामुळे हवामानातील बदलामुळे 2030 आणि 2050 मध्ये कुपोषण, मलेरिया, अतिसार तसंच वाढती उष्णता यामुळे दरवर्षी अंदाजे 2 लाखांहून अधिक मृत्यू होऊ शकतात असं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलंय, असंही ते म्हणालेत.