मुंबई : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा पाचवा अहवाल प्रसिद्ध केलाय. यामध्ये आरोग्य मंत्रालयाने भारतातील 28 राज्यं, 8 केंद्रशासित प्रदेश, 707 जिल्ह्यांमधील सुमारे 6.37 लाख घरांचं सर्वेक्षण केलं. या अहवालावरून भारतात 15 वर्षांवरील लोकसंख्येतील पोषण, स्वच्छता, दारू, तंबाखूचे सेवन, रक्तदाब, उच्च रक्तदाब यासारख्या जीवनशैलीतील आजारांची स्थिती काय आहे, याची माहिती मिळाली आहे. 


सर्वेतून समोर आलेल्या खास गोष्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व्हेतून भारतातील लोकसंख्या नियंत्रणात आल्याचं समोर आलंय. भारतात आता प्रत्येक महिलेच्या सरासरी 2 मुलं  आहेत. तर गेल्या सर्वेक्षणात प्रति महिला सरासरी 2.2 मुले होती. भारतातही गर्भनिरोधकांचा वापर वाढल्याचं दिसून आलंय. 2015 मध्ये 54% लोकांनी गर्भनिरोधकांचा वापर केला होता, तर 67% लोक आता गर्भनिरोधक पद्धती वापरत आहेत.


सध्याच्या महामारीचं न संपणारं सत्र, बदललेल्या जीवनशैलीमुळे धोक्यात येणारं आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीतील असमतोल या आणि अशा अनेक गोष्टींचा विचार करत सध्याची पिढी एकतर गर्भनिरोधकांना प्राधान्य देते किंवा मूल होण्याचे बेत आखण्यास दिरंगाई करताना दिसते.


पूर्वी 60 टक्के स्त्रिया गरोदर राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत क्लिनिकमध्ये जात होत्या, आता हे प्रमाण वाढलं असून 70 टक्के महिला क्लिनिकमध्ये जातायत. सध्या भारतात 89 टक्के प्रसूती रुग्णालयात होत असल्याची नोंद आहे. 2015 च्या तुलनेत हे प्रमाण 10 टक्क्यांनी जास्त आहे. 


महिला होतात स्थूलतेच्या शिकार


भारतामध्ये 2015-16 च्या सर्वेक्षणात 21 टक्के स्त्रिया लठ्ठ होत्या, तर यंदाच्या सर्वेक्षणात 24 टक्के महिला लठ्ठ असल्याचं समोरं आलं आहे. पुरुषांमध्ये हा आकडा 19 टक्क्यांवरून 23 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 


एक चांगली बाब म्हणजे भारतातील महिलांची सामाजिक स्थिती सुधारलेली दिसतेय. शहरातील 81 टक्के महिला आणि ग्रामीण भागातील 77 टक्के महिला घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपलं मत व्यक्त करतायत. 79 टक्के महिलांकडे बचत बँक खातं आहे, तर 4 वर्षांपूर्वी 53 टक्के महिलांचं स्वत:चं बँक खाते होते. आता भारतातील 78% लोकांना हात धुण्याची सवय लागली असून 4 वर्षांपूर्वी ही संख्या 60 टक्क्यांवर होती.