केसगळतीचा त्रास कमी करून पुन्हा मजबूत केस उगवायला मदत करेल पुदीन्याचे तेल
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात थंडावा निर्माण व्हावा याकरिता अनेक उपचार फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश केला जातो.
मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात थंडावा निर्माण व्हावा याकरिता अनेक उपचार फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. अशातच चटणीपासून भाजीची चव वाढवायला मदत करणार्या पुदीन्याचाही आहारात, पेयांमध्ये समावेश केला जातो. चवीला पुदीना जितका स्वादिष्ट असतो तेवढेच त्याचे तेल अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. पुदीन्यामध्ये 'व्हिटॅमिन ए' घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पोटाचे आजार आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही पुदीना फायदेशीर ठरतो.
केसगळतीवर पुदीना फायदेशीर
केसगळतीची कारणं ही प्रत्येक मनुष्यागणिक वेगवेगळी असतात. काही वेळेस पोषक आहाराच्या अभावामुळे केसगळती होते. केसगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पुदीन्याचे तेल फायदेशीर ठरते.
कसा कराल वापर
केसगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी टाळूवर पुदीन्याच्या तेलाने मसाज करा. या तेलाच्या मसाजाने टाळूवरील रोमछिद्र खुली होतात. त्याजागी नवे केस उगवण्याची प्रक्रिया सुरू होते.
पुदीन्याच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सुल उघडून मिसळा.हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी टाळूला लावल्याने रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. सोबतच केसांची वाढ सुधारण्यास मदत होते. नवे येणारे केसदेखील मजबूत होतात.