बापरे! ओमायक्रॉनचे 8 नवे व्हेरिएंट सापडले? पहा कोणत्या तज्ज्ञाने केलाय दावा
कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्ली : देशात पुन्हा कोरोना (Corona) रुग्ण वाढू लागल्याने महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राने अलर्ट दिला आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिवांनी पाच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येतेय.
20 एप्रिल रोजी दिल्लीत कोरोनाचे 1,009 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली. ही संख्या 10 फेब्रुवारी नोंदवली गेलेली सर्वाधिक प्रकरणं आहे. Positivity Rate देखील 5.71% वर पोहोचला आहे.
दरम्यान, दिल्लीमधील ILBS रुग्णालयाचे संचालक डॉ. एसके सरीन यांनी कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकाराबद्दल मोठी माहिती दिली आहे.
ओमायक्रॉनच्या 8 नवीन व्हेरिएंटची शंका
डॉ. सरीन यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे नवीन व्हेरिएंट तयार झाल्याची शक्यता आहे, ज्यामुळे कोविडची प्रकरणं वाढू लागली आहेत. आयएलबीएसमध्ये अनेक नमुने तपासले गेलेत आणि मला असं वाटतं की, ओमायक्रॉनचे एकूण 8 नवीन व्हेरिएंट असू शकतात. त्यापैकी एक मुख्य आहे, ज्यामुळे संसर्गाची प्रकरणं पुन्हा वाढत आहेत.
ओमायक्रॉन पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सापडला होता. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली.
कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता डॉ. सरीन यांनी लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी सावध राहून मास्कचा वापर करावा, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.