लहान मुलांनाही होतोय कोरोना; केंद्र सरकारने सांगितलं काय करावं?
केंद्र सरकारच्या या गाईडलाईनमध्ये मुलांसाठी अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
दिल्ली : गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या साथीने थैमान घातलं आहे. देशात सध्या कोरोनाची तिसरी लाट असून लहान मुलांमध्येही संसर्गाचं प्रमाण दिसून येतंय. यासाठीच केंद्राने गुरुवारी 18 वर्षांखालील मुलांसाठी कोरोनाशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. या गाईडलाईनमध्ये मुलांसाठी अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
नव्या गाईडलाईन्सनुसार, स्टेरॉइड्स वापरल्यास 10 ते14 दिवसांनंतर याचा डोस कमी केला जावा. यामध्ये केंद्र सरकारने कोविडनंतरच्या काळजीवर अधिक भर दिला आहे.
पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्क आवश्यक नसल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. 6-11 वर्षे वयोगटातील मुलांनी त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली योग्यरित्या मास्क घालावे. तर 12 वर्षे आणि त्यावरील मुलांनी प्रौढ व्यक्तींप्रमाणे मास्क घालावेत.
मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाणे, लक्षणं नसलेल्या आणि सौम्य प्रकरणांमध्ये, अँटीमायक्रोबायल औषधं थेरपी किंवा प्रोफिलॅक्सिस औषधांचा सल्ला दिला जात नाहीये. संसर्गाची तीव्रता लक्षात घेता, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर करण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.
पोस्ट कोविड केअर
लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या मुलांची योग्य काळजी, लसीकरण आणि न्यूट्रीशन यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. रुग्णालयातून डिस्चार्ज दरम्यान, कोरोनाबाधिक ग्रस्त मुलांच्या पालकांनी त्यांच्या श्वसनाच्या समस्यांवर सतत लक्ष ठेवलं पाहिजे.