Corona Update : कोरोनाबाबत राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात कोरोना संक्रमणचा धोका पुन्हा वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असं आवाहन सरकारकडून करण्यात येतंय. कोविड रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून रूग्णसंख्या अधीक वाढली तर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करोनासंसर्ग पुन्हा वाढत असून काही जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं उपलब्ध माहितीवरून स्पष्ट होतंय. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.59 टक्के असला तरी मुंबईमध्ये हा दर 3.16, तर पुणे येथे 2.16 टक्के असल्याचं आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होतं.


मुंबई-पुण्यात दैनंदिन रुग्णसंख्या वाढली
मुंबईमध्ये 12 ते 18 मे या कालावधीत 1,002 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 19 ते २५ मे या कालावधीत 1,531 नवीन रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले आहेत. 


पुण्यामध्ये याच कालावधीत 297 वरून नवीन रुग्णसंख्या 329 इतकी झाली आहे. मुंबईमध्ये नवीन रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ, तर पुणे येथे -9.73 टक्क्यांची घट दिसून येते. ठाण्यातही रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांचा एकत्रित विचार केला असता 35.86 टक्क्यांची रुग्णवाढ दिसून येते. इतर जिल्ह्यांमध्ये ही वाढ 3.96 टक्के इतकी आहे. 


राज्यामध्ये 12 ते 18 मे या कालावधीत 1,699 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, तर 19 ते 25 मे या कालावधीत 2,276 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही वाढ 33.96 टक्के इतकी आहे.


त्यामुळे लोकांनी काळजी घेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


70 टक्के लोकांचं लसीकरण
दरम्यान, राज्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या 10 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 70 टक्के लोकांनी आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अजूनही 30 टक्के लोकांना लस मिळालेली नाही. अलीकडील अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की, करोनाची तीव्रता रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. यानंतरही अनेकजण लसीकरणासाठी अजूनही उत्सुक नसल्याचं दिसतंय.