कोरोना झालेल्यांना Heart Attack आणि स्ट्रोकचा धोका? काय सांगतो अहवाल
लँसेटच्या अहवालानुसार धक्कादायक माहिती समोर, कोरोनाची लागण झालेल्यांना या आजारांचा धोका
मुंबई: कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात येत आहेत. एकीकडे राज्यातील कोरोनाचं संकट नियंत्रणात येत असताना मात्र आता पोस्ट कोव्हिडचा धोका वाढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना होऊ गेल्यानंतर किंवा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वेगवेगळे आजार पसरत आहेत. याशिवाय ब्लॅक फंगसचा धोकाही आहेच.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये हृदयविकार आणि स्ट्रोक्स म्हणजे पक्षाघाताचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लँसेटच्या ताज्या अंकात आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचं समोर आलं आहे.
कोरोना मुक्तीनंतर पहिल्या दोन आठवड्यात रुग्णांना हृदयविकार, स्ट्रोक्स येण्याचं प्रमाण जवळपास तीन पटीनं वाढलं आहे. स्वीडनमध्ये 2020 साली सुमारे ८५ हजार रुग्णांचा सर्व्हे करण्यात आला. त्यात हे निष्कर्ष समोर आल्याचं लँसेटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पोस्ट कोव्हिड रुग्णांनी काळजी घेणं जास्त गरजेचं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
श्वास घेताना त्रास होणं हे हार्ट अटॅकचं एक महत्त्वाचे लक्षण आहे. श्वास घेताना त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. चक्कर येण्याचं प्रमाण वाढल्यास काळजी घ्या. शरीरात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने चक्कर येण्याचे प्रमाण वाढते. छातीत दुखणे हे देखील हृद्यविकाराचा धोका असल्याचे संकेत देतात. अनेकदा हृद्यविकार आणि अॅसिडीटी यांच्यामध्ये गल्लत होण्याचं कारण आहे.