मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यासाठी अडचणी, कफ अशी कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगितलं जात आहे. या लक्षणांव्यतिरिक्त श्वास घेतल्याने आणि बोलण्याने देखील कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे. त्यामुळे तोंडाला मास्क नाहीतर स्वच्छ रूमाल लावणं अत्यंत गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संसर्ग रोगांचे प्रमुख एंथनी फॉनी यांनी अमेरिकेच्या एका वृत्त वाहिनीला दिलेल्या  मुलाखतीत कोरोना व्हायरसबाबत नवीन दावा केला आहे. ते म्हणाले, 'नुकताच मिळालेल्या माहितीनुसार फक्त सर्दी, खोकला, ताप यांमुळे कोरोनाची लागण होत नसून श्वास घेतल्यामुळे आणि बोलण्यामुळे देखील कोरोना व्हायरसचा संसर्ग होवू शकतो. ' 


कोरोना व्हायरसचं गांभीर्य लक्षात घेत त्यांनी प्रत्येकाने मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सने देखील व्हाईट हाऊसला पत्र पाठवून या संशोधनाबद्दल माहिती दिली होती. दरम्यान या शोधाच्या परिणामाबाबत काहीही सांगण्यात येवू शकत नाही, पण आतापर्यंत करण्यात आलेल्या आभ्यासानुसार श्वास घेण्यामुळे या विषाणूचे एरोसोलायझेशन होऊ शकते. म्हणजेच ते हवेत देखील पसरतात.


जगभरात आतापर्यंत १४ लाख ३० हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ लाख २ हजार १७ जण कोरोना आजारातून मुक्त झाले आहेत.  कोरोनाचं प्रमुख केंद्र असलेल्या चीनमधल्या वुहान शहरातून लॉकडाऊन उठविण्यात आले आहे.