मुंबई : सेल्फी काढून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा सध्या ट्रेंड आहे. परंतु सोशल मीडियावर आपण चांगले दिसत नसल्याचे नैराश्यही अनेकांमध्ये आहे. त्यामुळेच आता सोशल मीडियावर सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी करण्याकडे कल वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. याला सेल्फी डिसमॉर्फिया म्हटले जाते. उजव्या हाताने मोबाईल उंचावून समोरच्या कॅमे-यासमोर क्लिक केले की झाले. सेल्फी तयार अपलोड करण्यासाठी. परंतु या सेल्फीमध्ये सुंदर दिसण्यासाठी लागणारे सौंदर्य सर्वांकडेच आहे, असे नाही. मग सोशल मीडियावरच्या आपल्या फोटोला ढिगभर लाईक हव्या असतील, आपणही सुंदर हवे, ही भावना वाढीस लागली आहे. त्यातूनच मग कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी करण्याच्या प्रमाण वाढत आहे.  


सुंदर नसल्याने नैराश्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस्थेटिक क्लिनिक्सने त्यांच्या कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शाखांमध्ये कॉस्मेटिक सर्जरींसाठी येणाऱ्या ३०० रुग्णांचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढलेत. परफेक्ट सेल्फी मिळत नाही म्हणून ७४ टक्के स्त्रियांचा तर ६९ टक्के पुरुषांचा आत्मविश्वास खालावलेला असल्याचे दिसले. कॉस्मेटिक सर्जरीद्वारे रूप बदलण्याची इच्छा असण्याचे पुरुषांमध्ये ६२ टक्के तर स्त्रियांमध्ये ७४ टक्के प्रमाण आहे. मुंबईतल्या ६३ टक्के पुरुष आणि ७५ टक्के पुरुषांमध्ये सुंदर नसल्याने नैराश्य आल्याचे दिसते. धक्कादायक म्हणजे १६ ते २५ या वयोगटातील तरूण-तरुणी आठवड्यातील ५ तासांपर्यंतचा वेळ सेल्फी काढण्यात आणि ते पर्सनल प्रोफाइलवर अपलोड करण्यात घालवतात. 


 घातक परिणाम


सेल्फी घेवून त्या अपलोड करण्याच्या मूडवर आणि शारीरिक आकर्षकतेच्या भावनेवर नकारात्मक परिणाम दिसून आला. तसंच त्यांच्यामध्ये अधिक चिंता, खालावलेला आत्मविश्वास दिसून आला. सेल्फी रिटच आणि रिटेक करण्याची संधी मिळालेल्यांमध्येही हे घातक परिणाम दिसून आले, अशी माहिती सौंदर्य आणि त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर, प्लास्टिक सर्जन डॉ. देबराज शोम यांनी दिली.


मानसिक आरोग्य


सुंदर दिसण्याची प्रत्येकांमध्ये असलेली भावना आणि आता त्याला सोशल मीडियाचे मिळत असलेले पाठबळ, याचा परिणाम मनावरही होताना दिसत आहे. यातून सेल्फी डिसमॉर्फिया नावाचा नवा आजार जडू लागला आहे. वारंवार सेल्फी घेत राहणे हा स्वत:चे शरीर सतत तपासत राहण्याचाच प्रकार असून मानसिक आरोग्याचा विचार करता हे धोकादायक ऑनलाइन वर्तन आहे, असे मत केईएम रुग्णालयाच्या मनोविकार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर सांगतात.


सौंदर्यापेक्षा मन सुंदर हवे!


आयुष्यात बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याची अधिक गरज असते, परंतु हे तारूण्यात खूप कमी जणांना कळते. आणि जेव्हा हे समजते तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे पालकांनो आपल्या पाल्यांना स्मार्टफोन देताना सेल्फीसाठी सुंदर नको, तर मन सुंदर हवे, हे आवर्जुन सांगा.