भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस अद्याप जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी भारत बायोटेकने अनेक महिन्यांपूर्वीच अर्ज केला असून आवश्यक कागदपत्रेही सादर केली आहेत. मात्र या लसीला जागतिक आरोग्य संस्थेकडून मंजूरी मिळण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, WHOने भारत बायोटेकला अजून टेक्निकल प्रश्न पाठवले आहेत. ज्यामुळे लसीला मंजुरी मिळण्यास अधिक वेळ लागू शकतो. या विलंबामुळे लस घेतलेल्या भारतीयांच्या परदेश प्रवासावर परिणाम होऊ शकतो.


WHOच्या इमरजेंसी यूज ऑथोरायजेशनशिवाय (EUA), कोव्हॅक्सिन ही लस जगातील बहुतेक देशांमध्ये मान्यता प्राप्त लस मानली जाणार नाही.


अलीकडेच, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी सांगितलं होतं की, "ही लस लवकरच मंजूर होऊ शकते. मंजुरीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रं सादर करण्याची एक प्रक्रिया आहे. कोवॅक्सिनसाठी डब्ल्यूएचओची आपत्कालीन वापराची परवानगी लवकरच मिळू शकते."


हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीने 1 एप्रिल रोजी WHOकडे मंजुरीसाठी अर्ज केला. लसीला मंजुरी देण्याबाबत चर्चा करण्यासाठी डब्ल्यूएचओचा स्ट्रॅटेजिक एडवाइजरी ग्रुप (SAGE) 5 ऑक्टोबर रोजी बैठक घेण्याची शक्यता आहे.


WHO कडून मंजुरी मिळवण्यासाठी किती टप्पे?


  • उत्पादकाच्या EoI (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट)ची मान्यता

  • डब्ल्यूएचओ आणि निर्माता यांच्यात प्री-सेशन मीटिंग

  • WHO ने पुनरावलोकनासाठी डोजियरची मंजूरी 

  • असेसमेंटच्या परिस्थितीवर निर्णय

  • मंजूरीवर शेवटचा निर्णय


जेव्हा 5 ऑक्टोबर रोजी SAGE ची बैठक होईल, तेव्हा ते तीनही टप्प्यासाठी क्लिनिकल चाचणी डेटाचे पुनरावलोकन करू शकतात आणि EoIना स्वीकारायचे आहे की नाही हे ठरवू शकतात.


कोणत्या देशांमध्ये कोवॅक्सिनला मंजूरी?


जानेवारी 2021 मध्ये, भारताने आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाचे कोविशील्ड आणि भारत बायोटेकचे कोवॅक्सिन मंजूर केलं. भारताशिवाय, आठ देशांनी कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे - गयाना, इराण, मॉरिशस, मेक्सिको, नेपाळ, पॅराग्वे, फिलिपिन्स, झिम्बाब्वे इत्यादी.